बियाण्याची उगवण न झाल्यास उत्पादक कंपन्यांवर कारवाई- पालकमंत्री ना. बच्चू कडू

0
335

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला:सध्या खरीप हंगामाची तयारी व लगबग सुरु आहे. शेतक-यांना दर्जेदार बियाणे वाजवी दरात उपलब्ध व्हावे यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. तथापि, बोगस बियाणे वा उगवण न होणारे बियाणे शेतकऱ्यांना विक्री झाल्यास संबंधित बियाणे उत्पादक कंपन्यांवर कारवाई करावी, असे निर्देश राज्याचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज दिले.
जिल्ह्यात काही ठिकाणी बियाणे विक्रेते कृषी सेवा केंद्र चालक शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे विक्री करतांना उगवण चाचणी करु याबाबत शिक्का मारुन सही घेऊन विक्री करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याबाबत पालकमंत्री ना. कडू यांनी बि-बियाणे खते उपलब्धता याबाबत आढावा घेतांना वरील निर्देश दिले. यावेळी आ. नितीन देशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरव कटीयार, मनपा आयुक्त निमा अरोरा, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. के. व्ही. खोत, जिल्हा कृषी विकास अधिकारी तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात अशापद्धतीने शेतक-यांना बियाणे विक्री होत असेल तर संबंधित उत्पादक कंपनीला जबाबदार धरुन कारवाई केली जाईल,असे सुस्पष्ट निर्देश ना. कडू यांनी यावेळी दिले. यावेळी माहिती देण्यात आली की, शेतक-यांना कृषी निविष्ठा घरपोच वा थेट बांधावर पोहोचविण्यासाठी कृषी विभागाने 631 व्हॉटसअप ग्रुपच्या माध्यमातून 66,500 शेतकरी सभासदांपर्यंत व त्यामार्फत सुमारे अडीच लाख शेतक-यांपर्यंत पोहोचत आहे. जिल्ह्यात यामाध्यमातून 290 शेतकरी गटांमार्फत आतापर्यंत 9,070 शेतक-यांना थेट बांधावर कृषी निविष्ठा पोहोच झाल्या असून हे काम सुरुच आहे. त्यात आतापर्यंत 3,080 क्विंटल बियाणे व
1,620 मेट्रीक टन खते पोहोचविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी खोत यांनी दिली.
याकाळात शेतक-यांना कृषी निविष्ठा पोहोचविण्याचे उत्कृष्ट कार्य करणा-या कृषी सेवा केंद्र चालक, कृषी सहाय्यक, कृषी सेवक यांचे सत्कार करा, त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरव करा,असेही निर्देश ना. कडू यांनी यावेळी दिले.

Previous articleरुग्णाच्या मृत्यूप्रकरणी आयकॉन रुग्णालयाविरुद्ध चौकशीचे आदेश
Next articleगर्भधारणा असतानाही केली कूटूंब नियोजन शस्त्रक्रिया, सामान्य रुग्णालयातील प्रकार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here