मंगेश फरपट
व-हाड दूत न्युज नेटवर्क
नांदुरा: शेतक-यांच्या हक्काचा पीक विमा तात्काळ मंजूर करा अशी आग्रही मागणी आमदार राजेश एकडे यांनी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे आज निवेदनाद्वारे केली आहे.
खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतीची मशागत करणे, बी-बियाणे व खते खरेदी करणे, शेती उपयोगी अवजारे खरेदी करणे अशा विविध कामासाठी शेतक-याला आर्थिक गुंतवणूक करावी लागते. परंतु खरीप हंगाम 2020 चा शेतक-यांचा पिक विमा अद्याप पर्यंत मंजूर झालेला नाही. परिणामी शेतकरी बांधवांसमोर गंभीर आर्थिक प्रश्न उभा राहिला आहे. मागील 14 महिन्यांपासून राज्यासह बुलढाणा जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सुरू असलेले लॉकडाऊन, कधी आसमानी तर कधी सुलतानी संकट, मागील खरीप व रब्बी हंगामात झालेले मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान यामुळे शेतकरी वर्ग प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे. पुन्हा सावकारी कर्ज काढण्याची वेळ त्याच्यावर आली आहे. परिणामी आणखी बिकट आर्थिक परिस्थितीला शेतकरी बांधवांना सामोरे जावे लागेल. या सर्व बाबीचा विचार करून शेतक-यांच्या हक्काचा पीक विमा तात्काळ मंजूर करावा अशी सूचना आमदार राजेश एकडे यांनी केली आहे.