परीक्षा नाही तर परीक्षा शुल्कही नाही
पालकांची मागणी; विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाकडून शिक्षणमंत्र्यांना निवेदन
वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला :कोरोना महामारीमुळे सन 2020-21 या शैक्षणिक सत्रातील दहाव्या वर्गाची परिक्षा रद्द झाली. परीक्षा नाही तर शुल्कही नाही अशी भूमिका पालकांनी घेतली असून परिक्षा शुल्क परत करण्याची मागणी जोर धरत आहे. या मागणीला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघानेही पाठींबा दिला असून लेखी निवेदन मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांना पाठवले आहे.
संपूर्ण राज्यामध्ये कोवीड-19 चा प्रादुर्भाव वाढल्यामुळे लॉकडाऊन व संचारबंदी सारख्या उपाययोजना केल्या जात आहे. सदर संसगार्चा विद्यार्थ्यांना प्रादुर्भाव होऊ नये व प्रसार होऊ नये या उदात्त उद्देशाने सत्र 2020-21 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाव्दारे घेण्यात येणारी एस.एस.सी (वर्ग 10 वी) ची परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे. लॉकडाऊन कालावधीमध्ये विद्यार्थ्यांच्या पाल्यांचे रोजगार गेलेले आहेत त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत असल्याने परीक्षा नाही तर परीक्षा शुल्क नाही या तत्वाचा वापर करून विद्यार्थ्यांकडून गोळा करण्यात आलेली परीक्षा शुल्क तात्काळ परत करण्यात यावी. गेल्या वर्षभरापासून कोरोना आपत्तीमुळे अनेक पालकांची आर्थीक परिस्थिती बिकट आहे. कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवणे कठीण झाले आहे. अशापरिस्थितीत पालकांना शैक्षणिक शुल्कासह परिक्षा फी परत मिळाली तर त्यांच्या उदरनिर्वाहासाठी ही रक्कम उपयोगी पडू शकते. शिवाय अकरावीच्या प्रवेशासाठी या रकमेचा ख-या अर्थाने लाभ होवू शकेल.
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचा मागणीला पाठिंबा
पालकांची मागणी योग्य असून विद्यार्थी हित व पालकांची आर्थिक अडचण लक्षात घेवून परिक्षा शुल्क परत देण्यात यावे अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेने केली आहे.
मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांना निवेदन
परिक्षा शुल्क परत देण्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करण्यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना लेखी निवेदन पाठवले आहे.