वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात रेमडीसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार होत आहे. सामान्य नागरीकाला रेमडीसिव्हीर इंजेक्शन मिळत नाही. परंतु हेच इंजेक्शन काळ्या बाजारात अव्वाच्या सव्वा भावात मिळत आहे. सामान्य नागरीकांना रेमडीसिव्हीर इंजेक्शन तात्काळ मिळावे तसेच औषध प्रशासन याबाबत काय नियोजन करीत आहे. याची माहिती घेण्यासाठी आमदार संजय गायकवाड अन्न औषध प्रशासन कार्यालयात पोहचले. औषध प्रशासन विभागाशी चर्चा करुन याबाबतची माहिती जाणून घेतली.
सध्या जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी उपाययोजना करण्यात येत असून कोरोना रुग्ण संख्याही वाढत असल्याने रेमडीसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडाही दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे रेमडीसिव्हीर इंजेक्शनचे काळा बाजारीकरण करणा-यांनी तोंड वर काढले आहे. रेमडीसिव्हीर इंजेक्शन फक्त सामान्य रुग्णालयातच मिळत असल्याने हे इंजेक्शन बाहेर काळ्या बाजारात अव्वाच्या सव्वा भावात रुग्णांच्या नातेवाईकांना विकल्या जात असल्याचा प्रकार समोर येत आहे. याचा जाब विचारण्यासाठी आज 27 एप्रिल रोजी बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड अन्न व औषध प्रशासन कार्यालयात धडकले. हे इंजेक्शन फक्त सामान्य रुग्णालयातच उपलब्ध असून बाहेर कसे काय मिळत आहे, याबात विचारणा केली. यासह बुलडाणा जिल्ह्यासाठी आलेल्या रेमडीसिव्हीर इंजेक्शनच्या साठ्याची सविस्तर लेखी माहिती सादर करण्याचे निर्देश आ. गायकवाड यांनी दिले. यावेळी अन्न सुरक्षा उपायुक्त सचिन केदारे, औषध निरीक्षक जि. पि. घिरके उपस्थित होते.