वाशीम: सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंतच दुकाने सुरू राहणार

0
400

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क

  • सर्व प्रकारची हार्डवेअर दुकाने, कृषि संबंधित सेवा दुकाने बंद
  • बँक, एटीएम, विमा कार्यालये सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंतच सुरु

वाशिम: कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदी नियमात बदल करण्यात आला असून १८ एप्रिल रोजीच्या रात्री ८ वाजेपासून जिल्ह्यात सुधारित नियम लागू करण्यात आले आहेत. यानुसार दवाखाने, मेडिकल वगळता इतर सर्व अत्यावश्यक सेवा सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. तसेच सर्व हार्डवेअर्स दुकाने बंद राहणार आहेत. तसेच बँक सुद्धा सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी १८ एप्रिल रोजी निर्गमित केले आहेत.

या आदेशानुसार दुध संकलन व विक्रीकरिता सकाळी ८ ते सकाळी १० वाजेपर्यंत आणि सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत मुभा राहील. दुध व्यावसायिकांना दुध वितरणासाठी सकाळी ८ पूर्वी शहरामध्ये येता येईल, तसेच सायंकाळी ७ वाजेनंतर घरी जावू शकतील. मात्र त्यांच्याकडे दुधाची कॅन सोबत असणे आवश्यक आहे. अत्यावश्यक बाबीतील सर्व हार्डवेअर्सची दुकाने व कृषि संबंधित सर्व दुकाने, आस्थापना बंद करण्यात आल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांना कृषि संबंधित साहित्याची आवश्यकता असेल त्यांनी संबंधित दुकानदार यांच्याशी दूरध्वनीद्वारे मागणी नोंदवून संबंधित ग्राहकाने स्वतः ही वस्तू दुकानातून घेवून जावी. केवळ त्या वेळेपुरते दुकान उघडता येईल. इतर कोणत्याही परिस्थितीत दुकानदार यांनी दुकानातून मालाची विक्री करू नये, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत असलेली कार्यालये, आरोग्य विभाग, पोलीस यंत्रणा, पाणी पुरवठा, नगरपालिका व विद्युत वितरण कंपनीची कार्यालये २४ तास सुरु ठेवण्यास मुभा राहील. जिल्ह्यातील इतर सर्व कार्यालये, बँका, एटीएम, विमा कार्यालये सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंतच सुरु राहतील. शहरातील व गावातील पेट्रोलपंप सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरु राहतील. हाय वेवर शहराबाहेर व गावाबाहेर असलेले पेट्रोलपंप २४ तास सुरु ठेवण्यास मुभा राहील. खाजगी वाहतूक सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंतच सुरु राहील. सार्वजनिक वाहतूक नियमितपणे सुरु राहील. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये केवळ दवाखाने, मेडिकल, किराणा दुकान, भाजीपाला व फळांची दुकाने, डेअरी, मटन, चिकन, अंडी, मासे विक्रीची दुकाने सुरु राहतील, इतर सर्व दुकाने बंद राहतील. परवानगी देण्यात आलेल्या सर्व दुकानांना १४ एप्रिल रोजीच्या आदेशानुसार कोरोना सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे.

या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांनी भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल. अशा व्यक्ती, संस्था अथवा समूह यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित ठाण्याचे उपनिरीक्षक दर्जापेक्षा कमी नाही, अशा अधिकाऱ्यास प्राधिकृत करण्यात आले आहे.

Previous articleमाजी आ. विजयराज शिंदे यांना शिवसैनिकांची मारहाण, बुलडाण्यात भाजप-शिवसेनेत राडा
Next articleफुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’ बाबत आरोग्य विभागाची जनजागृती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here