व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: रेशन दुकानातून कोरोना काळात वाटप झालेल्या धान्याचे शासनाने मंजूर केलेल्या 55 हजाराच्या निधीचा धनादेश देण्यासाठी त्या रकमेच्या 10% प्रमाणे 5,500/-रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणात तहसीलदार विजय सुखदेव लोखंडे यांना लाच लुचपत विभागाच्या पथकाने १६ एप्रिलरोजी रात्री उशिरा अटक केली.
कोविड १९ चे काळात शासनाने गोरगरिब नागरिकांना मोफत धान्य वाटप करण्यात आले होते. त्या वाटपाची रक्कमेचा धनादेश काढून देण्यासाठी ५ हजार ५०० रुपयांची मागणी पुरवठा निरिक्षक निलेश भास्कर कळसकार यांनी केली होती. तक्रारीअंती निलेश कळसकार विरुद्ध रामदास पेठ पोलिस ठाण्यात अ.प.नं. २४६/21 कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे तपासादरम्यान घेण्यात आलेल्या जाबजबाबावरून तसेच प्राप्त व जप्त केलेल्या दस्तऐवजानुसार तहसीलदार विजय लोखंडे यांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग करून गैरफायदा मिळवण्याच्या अपेक्षेने सार्वजनिक कर्तव्य अनुचितपणे व अप्रामाणिकपणे केल्याचे निष्पन्न झाले. सदर गुन्हयात कलम ७ सी. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अंतर्गत विजय लोखंडे यांना १६ एप्रिलरोजी रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात आणखी आरोपींची संख्या वाढणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.