700 लोकसंख्येच्या पोटा गावात 105 पॉझिटिव्ह, भितीपोटी नागरिकांचे शेतात बि-हाड
व-हाड दूत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: सातशे लोकसंख्या असलेल्या नांदुरा तालुक्यातील पोटा या गावात एकाच दिवशी 75 नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. गावात तेरवीचा कार्यक्रम झाल्यानंतर काही लोकांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे गावक-यांनी सांगितले. आपल्यालाही कोरोनाची लागण होवू नये म्हणून भितीपोटी गावाशेजारी मळा असलेल्या नागरिकांनी बि-हाड थाटले आहे.
पोटा या गावात काही दिवसापूर्वी तेरवीचा कार्यक्रम झाला. त्यात 16 नागरिक पॉझिटिव्ह आले होते. त्यातील एकाचा मृत्यू सुद्धा झाला होता. रुग्णसंख्येत वाढ होत जावून ती 75 पर्यंत पोहचली. आतापर्यंत गावातील 150 लोकांची टेस्ट करण्यात आली. सद्यस्थितीत गावात 105 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणा खळबळून जागी झाली आहे. टाकरखेड प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत हे गाव येत असून जिल्हा आरोग्य अधिकारी सांगळे यांच्या मार्गदर्शनात गावातील नागरिकांची वैद्यकीय तपासणी व स्वॅब टेस्टींग केली जात आहे. गावातील धोका अद्याप टळला नसून नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे. आरोग्य यंत्रणा अॅक्शन मोडवर आली असून गावातच ऑक्सीजन लेवल तपासणी, स्वॅब टेस्ट करण्यावर भर दिला जात आहे.
नागरिकांची शेतात धाव
गावातील रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. भितीपोटी नागरिकांनी कुटूंबासह शेताकडे धाव घेतली असून अनेकांनी बि-हाड सुद्धा थाटले आहे. गाव परिसरातील नागरिकांमध्येही भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे या गावाशी संपर्क सुद्धा तुटला आहे.
अख्खे गावच सिल
दक्षता म्हणून अख्खे गावच सिल करण्यात आले आहे. गावातील चारही बाजू बंद करण्यात आल्या आहेत. पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे परिस्थितीवर स्वत: लक्ष ठेवून आहेत.