ठाकरे साहेब, आम्हाला जगवायचे आहे की मारायचे आहे..

0
621

व-हाड दूत न्युज नेटवर्क
बुलडाणा: कोरोना ही न संपणारी प्रक्रिया आहे, आज निगेटिव्ह आलेला व्यक्ती उद्या पॉझिटिव्ह येऊ शकतो. मग आयुष्यभर लॉकडाऊन करणार का? जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा स्पष्ट केले की कोरोना बरोबर जगावे लागेल. एक वर्षापासून सर्व छोटे व्यवसाय बंद आहेत त्यांनी जगायचे कसे? असा प्रश्न व्यापा-यांनी उपस्थित केला असून लॉकडाऊन हटवण्याची मागणीही करण्यात आली आहे.
त्यांच्या जगण्याची सोय अगोदर सोय करा आणि नंतरच लॉक डाऊन करा. जे चार दोन टक्के लोकं लॉकडाऊन पाहिजेच असे म्हणणारे आहेत, हे सरकारी कर्मचारी आहेत. सर्वात अगोदर यांचा पगार बंद करा म्हणजे त्यांना समजेल लॉकडाऊन काय असतो. हातावर पोट असणाऱ्या व्यक्तीला संध्याकाळच्या जेवणाची चिंता असते तो कसा जगणार? घरात बसून जे पगार घेतात त्यांना कशाला पगार पाहिजे ? त्यांना काम नको म्हणून तर ते लॉकडाऊन ची मागणी करतात. त्यांचा पगार बंद करा मग कसे रस्त्यावर उतरतात बघा. आम्ही तुमच्याकडे कोणतीच मागणी करत नाही तर आमचे काम सुरू करण्याची मागणी करतोय. हे पुन्हा लक्षात घ्या देश हा घरात बसून खाणाऱ्यांवर अवलंबून नसतो तर कष्टकरी, श्रमिक यांच्यावर अवलंबून असतो.
वर्षभर कोरोनाने मारले आता तुम्ही लॉकडाऊन करून मारा. प्रशासन म्हणून तुमची जबाबदारी आहे कोणी उपाशी मरणार नाही ,तुम्ही कोणती तजवीज केली त्यासाठी. तुम्हाला नेमकं काय सिद्ध करायचंय लॉकडाऊन करून?
साहेब आपणही सामान्य घरातूनच पुढे गेले असाल ,सर्वसामान्य माणूस कसा जगतो हे आपणाला माहीतच असेल. जे तुपाशी आहेत त्यांचा विचार करू नका पण जे उपाशी आहेत त्यांचा जरूर विचार करा. काही दिवसांनी कोरोना हा सामान्य आजार म्हणून जाहीर केला जाऊ शकतो , तोपर्यंत अनेक कुटुंबे उध्वस्त झालेली असतील. नियम कितीही कठोर असू द्या लोकं त्याचे पालन करतील ,पण लॉक डाऊन मुळीच नको! प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी आहे, ज्याला त्रास होईल तो स्वतः दवाखान्यात जाईल ,त्याला कोरोना अगोदर उपसमारीने मारू नका.
आजही भारतात अनेक कुटुंब अशी आहेत की घरात एक व्यक्ती कमावता आहे आणि बाकीचे त्याच्यावर अवलंबून आहेत ,विचार करा त्या एका व्यक्तीचा रोजगार बंद झाला तर ते कुटुंब कसे जगणार , असाच लॉकडाऊन राहिला तर लोकं उपसमारीमुळे आत्महत्या करतील. आपण महाराष्ट्राचे जिल्ह्याचे कुटुंबप्रमुख आहात खूप बारकाईने विचार करा.
लोकं सहकार्य करतील पण पुढे अशीच परिस्थिती राहिली तर आता लोकंही ऐकणार नाहीत , रस्त्यावर उतरतील , तुमच्या गुन्ह्यांना सुद्धा घाबरणार नाहीत. घरात उपाशी राहण्यापेक्षा जेल मध्ये जाऊन किमान दोन वेळेचे जेवण तरी मिळेल. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

Previous articleकर्तव्यावर असताना तलाठ्याचे निधन; 50 लक्ष रुपयांचे सानुग्रह अनुदान
Next articleयुवकाच्या मृत्यूप्रकरणी 108 रुग्णवाहिकेच्या चालकासह व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here