वऱ्हाड दूत न्युज नेटवर्क
मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा राजीनामा स्वीकृत करावा असे विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यपालांना दिले आहे. गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील (Dilip Valase Patil) यांच्याकडे देण्यात यावा असेही या पत्रात म्हटले आहे.
वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ व राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याबाबत देखील पत्रात विनंती करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांनी अनिल देशमुखांचा राजीनामा स्वीकारला
मुंबई हायकोर्टानं गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातील अॅड.जयश्री पाटील यांच्या याचिकेवर अत्यंत महत्वाचा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला. अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची प्राथमिक चौकशी सीबीआनं 5 दिवसात पूर्ण करावी, असा निर्णय कोर्टान दिला.यानंतर अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला. अनिल देशमुख यांनी त्यापूर्वी शरद पवार आणि अजित पवार यांची सिल्वर ओक वर भेट घेतली. यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेत राजीनामा दिला.
दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गृहमंत्रिपद
मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकारावा अशी विनंती केली. तर, गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा, अशी विनंती केली आहे. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या कामागर आणि राज्य उत्पादन शुल्क खात्याचा कार्यभार होता. महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांची हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. वळसे पाटील यांनी यापूर्वी विधानसभा अध्यक्षपद देखील भूषवले होते. त्या अनुभवाचा फायदा महाविकासआघाडीला झाला होता.
दिलीप वळसे पाटील यांच्या खात्याचा कार्यभार कुणाकडं?
दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे देण्यात आला आहे. तर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात यावा, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केली आहे.