क्षमा करण्यातच जीवनाचे मर्म : निलेश अघमकर

0
385

गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा

रुबेन वाळके
व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: अकोला शहरासह संपूर्ण जिल्हयात गुडफ्रायडे अर्थात उत्तम शुक्रवारचा सण 2 एप्रिल रोजी ख्रिश्चन धर्मिय बंधू भगिनींनी मोठया भक्तीभावाने साजरा केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करीत हा सण साजरा करण्यात आला.
अकोला शहरातील आठ चर्चेससह जिल्हयातील सुमारे तीस चर्चेस मधून आणि आपापल्या निवासस्थानांमधून धर्मगुरूंनी फेसबुक आणि व्हॉटसअ‍ॅपच्या माध्यमातून ख्रिश्चन बंधू भगिनींसोबत संवाद साधला. दरम्यान, प्रभू येशू ख्रिस्तांच्या पुनरूत्थानानिमित्त जगभरात उद्या, रविवारी ख्रिश्चन धर्मीय ईस्टर संडे हा सण साजरा करणार आहेत. त्यादिवशीही समाजमाध्यमांचा प्रार्थनासभांसाठी वापर करण्यात येणार आहे.
प्रभू येशू ख्रिस्तांनी मानवाच्या पापक्षालनासाठी क्रूसखांबावर दिलेल्या बलिदानाची आठवण म्हणून गुड फ्रायडे अर्थात उत्तम शुक्रवार हा सण साजरा केला जातो. अकोला शहर आणि जिल्हयातील चर्चेस आणि शहरातील प्रमुख चर्चेसच्या धर्मगुरूंनी शुक्रवारी आपापल्या निवासस्थानी प्रार्थनासभा आयोजित केली होती. या प्रार्थनासभेमध्ये चर्च आणि धर्मगुरूंच्या कुटुंबातील सदस्य सोशल डिस्टन्सींगचे भान ठेवीत सहभागी झाले. दरम्यान, काही चर्चेसमधून कोरोना नियमांचे पालन करीत तर शंभराहून अधिक सदस्य असलेल्या चर्चच्या सदस्यांसोबत धर्मगुरू यांनी व्हॉटसअ‍ॅप आणि फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधला.

यावेळी त्यांनी ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र धर्मग्रंथ बायबलमधील वचनांचा आधार घेत प्रभू येशू ख्रिस्तांच्या वधस्तंभावरील बलिदानाच्या घटनेवर प्रकाश टाकला. खदान ख्रिश्चन कॉलनी येथील बेथेल सेविअर्स अलायन्स चर्चचे रेव्हरंड निलेश अघमकर तसेच वैशाली डोंगरदिवे, राजेश ठाकूर, अमित ठाकूर, मीना बिरपॉल, मीनाक्षी वर्मा, सुवार्ता ढिलपे यांनी प्रभू येशू ख्रिस्तांनी वधस्तंभावर खिळलेल्या अवस्थेत असताना उच्चारलेल्या सात वाक्यांवर बायबलच्या वचनांच्या आधारे भाष्य केले. काही चर्चेस मध्ये धर्मगुरूंनी आपापल्या घरांमधूनच फेसबुक आणि व्हॉटसअ‍ॅपच्या माध्यमातून ख्रिश्चन बंधू भगिनींसोबत संवाद साधला. यावेळी ख्रिश्चन बंधू भगिनी यांनी गुडफ्रायडेनिमित्त विविध गीतेही सादर केली.
गेल्या चाळीस दिवसांपासून ख्रिश्चन धर्मियांचा लेन्थचा पवित्र महिना सुरू होता. या काळात ख्रिश्चन बंधू भगिनी उपवास आणि प्रार्थना करतात, घरोघरी कॉटेज प्रेअरचे आयोजन केले जाते परंतु यावर्षी कोरोनामुळे या कॉटेज प्रेअर्स रदद करण्यात आल्या. सर्वांनी चाळीस दिवस आपापल्या घरांमध्येच प्रार्थना केल्या. कोरोना विषाणूच्या संकटातून केवळ राज्य आणि देशच नव्हे तर संपूर्ण जगाची सुटका व्हावी यासाठी परमेश्वराकडे याचना व प्रार्थना करण्यात आली. दरम्यान, उद्या अर्थात रविवारी प्रभू येशूंच्या पुनरूत्थानानिमित्त ख्रिश्चन कॉलनी येथील बेथेल सेव्हिअर्स अलायन्स चर्चच्या प्रांगणात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत प्रात:कालीन प्रार्थना आणि सकाळी ९ वाजता प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली आहे, दरवर्षी निघणारी दिंडी मात्र रदद करण्यात आली आहे. रविवारीही काही धर्मगुरू आपापल्या निवासस्थानी प्रार्थनासभा घेतील, त्याचे फेसबुक आणि व्हॉटसअ‍ॅपच्या माध्यमातून सर्वत्र थेट प्रक्षेपण करण्यात येईल, अशी माहिती सदर चर्चेसच्या वरिष्ठ पदाधिकारी यांनी दिली. दरम्यान, यावेळी बोलताना रेव्हरंड निलेश अघमकर यांनी प्रभू येशू यांनी जगाला क्षमा, प्रेम, त्याग, बंधुभाव यांची शिकवण दिली, त्या शिकवणीचे आचरण करून एकमेकांना क्षमा करण्यातच जीवनाचे खरे मर्म आहे असे सांगितले.

Previous articleवाघांच्या राज्यात लांडग्यांची चलती कशी ? अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांचा राज्य शासनाला सवाल
Next articleशनिवार, रविवार लॉकडाऊन ! दररोज रात्री संचारबंदी दिवसा जमावबंदी!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here