कोविड संसर्ग नियंत्रण आढावा बैठक
व-हाड दूत न्युज नेटवर्क
बुलडाणा: जिल्हयात रूग्णांच्या संख्येत वाढच होत आहे. दिवसागणिक रूग्णांची वाढ दिसून येत आहे. ग्रामीण भागातही रूग्ण वाढलेले दिसतात. या पार्श्वभूवीर जिल्हयातील सर्व कोविड केअर सेंटर पुर्ण क्षमतेने सुरू करावे. कोविड केअर सेंटरवर असणाऱ्या सुविधांचा दर्जा चांगला ठेवावा, अशा सूचना जिल्हयाचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी दिले.
कोविड संसर्ग नियंत्रणासाठी कार्यदलाची आढावा बैठक 6 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आली. त्यावेळी पालकमंत्री डॉ शिंगणे आढावा घेतना बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, अति. जिल्हाधिकारी दिनेश गिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बाळकृष्ण कांबळे आदी उपस्थित होते.
यावर्षी होणाऱ्या सर्व यात्रा रद्द करण्याच्या सूचना करीत पालकमंत्री म्हणाले, जास्त गर्दी होणारे सर्व कार्यक्रम रदद करावे. कुठेही यात्रा आयोजित करण्यात येवू नये. ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढत आहेत. त्याठिकाणी असलेले तलाठी आणि ग्रामसेवक यांच्यावर जबाबदारी टाकावी. रूग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून चाचणी वाढववावी. तसेच परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची योग्य तपासणी करावी. कोविड केअर सेंटरवर रुग्ण असो की नसो कर्मचारी कार्यरत ठेवावे. येत्या तीन दिवसात बंद असलेले कोविड केअर सेंटर सुरू करण्यात यावे. तसेच हिवरा आणि नांदुरा येथील सीसीसी सेंटर तातडीने सुरू करावे.
ते पुढे म्हणाले, जिल्ह्यातील रुग्ण संख्या वाढत असून ही चिंतेची बाब आहे. भविष्यात रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते. त्यामुळे यंत्रणेने तयारीत राहावे, लस घेतली म्हणजे कोविड संसर्ग नियमांपासून दूर पळू नये. त्यामुळे लस घेणाऱ्याने देखील त्रिसूत्रींचा अवलंब करावा, तसेच सर्व जनतेने देखील त्रिसूत्रींचे काटेकोरपणे पालन करावे. यावेळी पालकमंत्री यांनी तालुकानिहाय आढावा घेतला. तसेच रक्त पुरवठा, लसीकरणाचा आढावाही घेतला. लसीकरण करताना उन्हाळयाचे दिवस असल्याने लसीकरणासाठी वयोवृद्ध लोक येणार असून त्यांना उन्हाचा त्रास होता कामा नये. लसीकरण ठिकाणी पाण्याची व सावलीची व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचनाही पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या.