वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला. येथील लक्कडगंज भागात मुख्य रस्त्यावरील चार दुकाने गुरुवारी पहाटे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. आग इतकी भीषण होती की दूरुन ज्वाळा दिसत होत्या. अग्निशमनदल उशीरा पोहोचल्याने बांबू, बल्ली, तट्टे, प्लायवूड आणि अन्य साहित्य जळून खाक झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्नीशामकदलाच्या 25 गाड्या लागल्या. मागील बाजूस असणारी घरे आणि दुकानांमध्ये टीन शेड असल्याने घरे वाचली.
प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी पहाटे पावणे तीन वाजताच्या सुमारास संदीप डेहणकर, प्रमोद डेहणकर, अनुपआप्पा रूईकर, नूर अहमद टिंबर मार्ट, विदर्भ टिंबर मार्ट यांच्या दुकानांना आग लागली. संदीप डेहनकर यांचे घर दुकानाला लागूनच आहे या घराला झळ पोहचली परंतु सुदैवाने अन्य घरापर्यंत आग पोहचू शकली नाही. मनपा अग्नीशमनदलाला पहाटे फोन लावला परंतु तो लागला नाही. त्यामुळे एहतेशाम अली नामक व्यक्ती दुचाकी वाहनाने फायर ब्रिगेड कार्यालय गाठले. त्यांना आगीच्या भीषणतेविषयी माहिती दिली. आणि 3.20 वा. फायर ब्रिगेड गाडीने आग विझवण्यास सुरुवात केली. मनपाचे विरोधी पक्ष नेता साजिदखान पठाण हेही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्याचे निर्देश दिले. बराच वेळ पर्यंत ते तेथे होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
25 गाड्यांनी विझवली आग
घटनास्थळी उपस्थित लोकांच्या माहितीनुसार, आग लागल्यावर ब-याचवेळा नंबर लागत नाही. त्यामुळे संबंधित कासावीस होतात. या बाबत मनपाच्या संबंधित विभागाने दक्षता घेणे गरजेचे आहे. तसेच फायर ब्रिगेड वाहन पोहचण्यात आणखी विलंब झाला असता तर अनर्थ घडला असता. कारण मागेच लोकांची घरे आहेत. दाटीवाटीने ते राहतात. आग आटोक्यात आणण्यासाठी 25 गाड्या पाणी लागले. तेव्हा कुठे आगीवर नियंत्रण आले. गुरुवारी दुपारपर्यंत धूर निघताना दिसत होता.
आमदार गोवर्धन शर्मांनी केली आर्थिक मदत
गुरुवारी सकाळी आमदार गोवर्धन शर्मा मुंबईहून अकोल्याला पोहोचले. आगीची माहिती मिळाल्याने ते लक्कडगंज भागात पोहोचले. आणि दहा लोकांना आणि दुकानदारांना श्रीरामनवमी सेवा समितीकडून आर्थिक मदत दिली. आ. शर्मा यांच्या समवेत माजी नगरसेवक हरीभाऊ काळे, नगरसेवक गिरीश जोशी, अजय शर्मा, विलास अनासने, कैलास रणपिसे, नितीन जोशी, मनीष मुरारका, शैलेश राठोड उपस्थित होते.
सरकारकडून मदत मागू
आमदार गोवर्धन शर्मा म्हणाले, आगीमध्ये ज्या दुकानदारांचे नुकसान झाले आहे. तसेच घरांचे नुकसान झाले त्यांना मदत मिळवून देण्यासाठी राज्य सरकारकडे मागणी करू. हा विषय लावून धरण्याची ग्वाही देखील आ. शर्मा यांनी दिली.