वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
मुंबई : बांद्रा येथील ताज लॅन्ड एन्ड या पंचतारांकित हॉटेलवर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केली असून मुदतबाह्य अन्न साठा नष्ट करुन स्टोरेज कक्षातील झुरळांचा प्रादुर्भाव दूर होईपर्यंत स्टोअरेज कक्ष बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.
राज्यातील जनतेच्या आरोग्याची हिताची जबाबदारी लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनाचा कारवाईचा एक भाग म्हणून मुंबईतील नामांकित पंचतारांकित हॉटेल मे. इंडियन हॉटेल्स कंपनी ली. ताज लॅन्ड एन्ड, बांद्रा (प) या हॉटेलमधील दि. 3 मार्च 2021 रोजी प्रशासनामार्फत तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये आस्थापनेतील अन्न पदार्थ साठविण्याच्या काही फ्रीजवरील तपमान निदर्शक यंत्रणा आढळून आली नाही. तसेच इथे गोडा, चिज, वॉटरमिलन ज्यूस, इडलीचे पीठ, फळाचे रस, ग्रिन ॲपेल इत्यादी अन्न पदार्थाचा मुदतबाह्य साठा अन्न पदार्थ तयार करण्यासाठी साठविल्याचे आढळून आले. तसेच मुख्य किचन मधील अन्न पदार्थ स्टोरेज कक्षात झुरळांचा प्रादुर्भाव आढळून आल्याने हे स्टोरेज कक्ष झुरळांचा प्रादुर्भाव दूर होईपर्यंत बंद करण्याचे तात्काळ निर्देश देण्यात आले. तसेच मुदतबाह्य अन्न पदार्थाचा साठा तात्काळ जनआरोग्याच्या हितार्थ नष्ट करण्यात आला व पुढील कारवाई अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत करण्यात येत आहे.
सदरची कारवाई पंचतारांकित तसेच तत्सम हॉटेलांच्या तपासणीसाठी तयार करण्यात आलेल्या विशेष पथकाचे अन्न सुरक्षा अधिकारी श्री. जी.एम. कदम, अन्न सुरक्षा अधिकारी श्री. यो.सु.कणसे व श्री. एम.एन.चौधरी, सहायक आयुक्त (अन्न) बृहन्मुंबई यांनी शशिकांत केकरे सहआयुक्त (अन्न) बृहन्मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.