तर… पश्चिम विदर्भात शिवसेनेचं चांगभलं ?

0
813

व-हाड दूत विशेष
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखली जाणारी शिवसेना महाराजांच्या नीतीने राज्य करते आहे, हा विश्वास जनतेत पोहचविण्यात सरसेनापती उद्धव ठाकरे प्रथमच मुख्यमंत्री पदावर विराजमान होऊन यशस्वी कारभार करित आहेत, असा सुर जनतेतून येत असताना मधेच आपदा आल्या.
महाराष्ट्र सरकार ज्या पक्षांच्या साखळीने राज्याचा डोलारा यशस्वीपणे सांभाळत आहे, त्याच पद्धतीने विरोधी पक्ष सबळ आपली भूमिका बजावत आहे. विरोधी पक्षाला मागील दोन घटनांमधून आयतेच कोलीत हाती मिळाले हे त्यांचे भाग्य तर सत्ताधारी लोकांचे दुर्भाग्य म्हणावे लागेल.

पाच वर्ष सरकार टिकणार असण्याची सर्व चिन्हे स्पष्ट दिसत असताना मध्येच धोक्याचे सावट आले. विरोधी पक्ष यासाठी चातकासारखी वाट पाहत असतो. धनंजय मुंडे प्रकरणाला धुळीची चादर चढत असताना परत राठोड या वादळाने ती झटकून टाकली. विरोधी पक्षाला नेमके हेच हवे असते. खरं तर विरोधक आक्रमक भूमिका घेणे साहजिकच आहे. शेवटी त्यांनी त्या भूमिकेत समरस झाल्याशिवाय पर्याय नाही. याकारणे सत्ताधारी पक्षांवर अंकुश ठेवला जातो, जो लोकशाहीचा आत्मा आहे.
राठोड प्रकरणामुळे शिवसेनेची काँलर नरमल्या गेली हे उघड गुपित आहे. ती डाँमेज कंट्रोल करणे आवश्यक आहे कारण सत्तेची तब्बल चार वर्षे बाकी आहेत. राठोडांची रिक्त जागा भरण्यासाठी विदर्भात गत सतरा वर्षाच्या आमदारकीचा समर्थपणे भार पेलणारे, विश्वासू, संयमी, अभ्यासू असे शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरीया सक्षम पर्याय आहेत. रिकाम्या जागा भरा असा परिक्षा पेपरातील सहज सोपा एका गुणाचा विषय नाही. ती राजकीय फिल इन द ब्लँक अचुक असली पाहिजे हे हि तेवढेच महत्त्वाचे.
अचानक निर्माण झालेली हि पोकळी भरताना सत्तेचा उपयोग व्हायला पाहिजे. तो उपयोग होत असताना सामाजिक समतोल सुद्धा राखला गेला पाहिजे. मंत्रीमंडळात हिंदी समाजातील एक मंत्री आल्यास त्याचा दिलासा हिंदी भाषिक लोकांना होऊ शकतो. मराठी भाषिक आणि हिंदी भाषिक यांच्या समन्वय साधण्यात हातखंडा, वाशिम – बुलडाणा – अकोला- हिंगोली – परभणी या जिल्ह्यातील सर्व पक्षांच्या नगरसेवकांसोबत असणारे सलोख्याचे संबंध, सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र घेऊन चालण्याचे कसब, वरिष्ठ पातळीवर असणार्‍या सर्व पक्षातील पुढाऱ्यांशी जवळीक बाजोरीया यांच्या जमेच्या बाजू भक्कम करतात. शिवसेनेच्या लोकप्रिय खासदार भावना गवळी यांची बाजोरीया यांना असणारी सबळ पाठराखण हे सुद्धा उल्लेखनीय आहे. व्यापारी ते कष्टकरी आणि शेतकरी वर्गाला समजून घेण्याची तसेच समस्यांची जाण असणे हे पैलू वाखरण्यासारखे आहेत.
आमदार बाजोरीया ज्या दिग्गजांना हरवून विधानसभेत तीनदा निवडणूक आले आहेत, हि बाब त्याच्या क्षमतेचे द्योतक आहे. कोणत्याही पक्षाचे मंत्री असो, अकोला दौरा जर असेल तर बाजोरीया यांची भेट अटळ असते. मुलगा विप्लव बाजोरीया यांना मराठवाड्यातून हिंगोली – परभणी मतदार संघात निवडून आणणे हे बाजोरीया यांच्या राजकीय कसबाचे उत्तम उदाहरण होय.
शिवसेनेला विदर्भ बळकट करण्याची नितांत गरज आहे. भाजपाने व्यापलेला अकोला जिल्हा जर खिळखिळा करायचा असेल तर येथे मंत्रीपदाची खेळी शिवसेनेने खेळलिच पाहिजे. विद्यमान केंद्रीय मंत्री संजय धोत्रे गटाचे प्राबल्य असलेल्या या जिल्ह्यात शिवसेनेला हि नामी संधी मिळाली आहे.
2024 मधे जर 2014 सालाप्रमाणे परिस्थिती निर्माण झाली तर 2021 मधे शिवसेनेने उचललेले हे पाऊल फार सकारात्मक परिणाम दाखविल्याशिवाय राहणार नाही, यासाठी कोणत्याही जोतिष्याची गरज नाही.
आदित्य ठाकरे यांच्या सक्रिय सहभागाने काळानुरूप बदलत्या शिवसेनेला हे वेळीच घेतलेले निर्णय पोषक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला बुलडाण्यात डाँ राजेंद्र शिंगणे यांच्या रुपाने कॅबिनेट मंत्री देता आला सोबतच अकोल्यात अमोल मिटकरी यांच्या रुपाने आमदार देता आला. आता शिवसेनेने आमदाराचे नामदार करुन गोपिकिशन बाजोरीया यांच्या रुपाने अकोल्यात कॅबिनेट मंत्री दिल्यास भविष्यात पश्चिम विदर्भात शिवसेनेचं चांगभलं होणार हे निशंक भविष्य म्हणावे लागेल.

संजय कमल अशोक
पत्रकार, अकोला
M. 7378336699

Previous articleलग्नाचे आमिष दाखवून २२ वर्षीय युवतीवर लैंगिक अत्याचार
Next articleआता व-हाडी बोली भाषेत शब्द, म्हणी व वाक्प्रचार शब्दकोश उपलब्ध

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here