मिर्झापूरच्या महिला सरपंचाने घेतले पाठीवर फवारणी यंत्र
संतोष चक्रनारायण |
व-हाड दूत न्युज नेटवर्क
बोरगाव मंजू ता. अकोला: महिला म्हटलं की , चूल आणि मूल इथं पर्यंत ग्रामीण भागातील जनतेचा महिलेच्या प्रति बघण्याचा दृष्टीकोन असतो, महिलांनी राजकारण करू नये, त्यांनी फक्त घरातील कामांकडे लक्ष द्यावे, पण त्याच्या पलीकडेही समाजात दैनंदिन जीवन जगत असताना अनेक महिला राजकीय ,तथा सामाजिक क्षेत्रात मोठ्या हिरहिरीने काम करताना बघायला मिळतात. त्याचे एक उदाहरण म्हणजे मिर्झापूरच्या महिला सरपंच चित्राताई ज्ञानेश्वर वानखडे यांचे. कोरोना नियंत्रणासाठी त्यांनी स्वत: पाठीवर फवारणी यंत्र घेवून गाव निर्जंतूकीकरण करण्यासाठी पुढाकार घेतला. पंचक्रोशीत त्यांच्या या कार्याची चांगली चर्चा आहे.
मिर्झापूर हे दोन हजार लोकवस्तीचे गाव. थेट जनतेतून चित्राताई ज्ञानेश्वर वानखडे सरंपच झाल्या. त्यांनी गावात विकासात्मक कार्यात भर पडावी म्हणून शासन स्तरावरून विविध योजना गावात राबविण्यास सुरवात केली. त्या दरम्यान त्यांना गावात चांगले वाईट अनुभवला सुद्धा सामोरे जावे लागले, तरीही त्या कधीही न डगमगता आपले सकारात्मक कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी नेहमी तत्पर असतात. याचे ताजे उदाहरण बघतील तर मिर्झा पूर गावात जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील संपूर्ण शहरी व ग्रामीण भागात कोरोना तपासणी कॅम्प घेणे सुरू केले. त्याच पार्श्वभूमीवर मिर्झापूर येथे कोरोना तपासणीचा गेल्या दोन दिवसांपूर्वी कॅम्प घेतला, त्यामध्ये चार जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले, त्यामुळे आरोग्य विभाग ,आशा वर्कर ग्रामपंचायतच सतर्क झाले.
यावरून गावाच्या सरपंच चित्राताई वानखडे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत पुरुष आणि महिलांच्या भेदभावाला दूर सारून गावाच्या हितासाठी, कोणत्याही वार्डात कोरोना प्रसार भविष्यात फैलु नये म्हणून स्वत: महिला सरपंच यांनी पाठीवर निर्जंतुकीरण फवारणी यंत्र घेतले. संपूर्ण गावातील वर्दळीच्या ठिकाणी निर्जंतुक फवारणी केली, त्याच प्रमाणे त्यांनी गावातील आशा वर्कर यांच्या सोबत संपूर्ण गावात फिरून आढावा घेतला. त्यांनी दाखवून दिले आपणही पुरुषाच्या बरोबरीत कार्य करू शकतो. गावक-यांनी देखील या रणरागिणीला सलाम केला असून पंचक्रोशीत त्यांच्या कार्याची प्रशंसा सुरु आहे.
सदैव असतात सक्रीय
महिला राजसत्ता आंदोलनमुळे त्यांना हे बळ मिळाल्याचे सांगतात. महिला राज सत्ता आंदोलन हे संपूर्ण राज्यात महिलांच्या हक्कासाठी लढणारे व्यासपीठ आहे. त्यांच्या सोबत गेल्या 4 वर्षापासून त्या जुळल्या आहेत. त्याचे विविध प्रशिक्षण घेतले आहे. त्याचबरोबर बॉसकोर्स, ग्रामदृष्टी प्रकल्प ह्या आंदोलनाच्या विविध उपक्रमात सहभागी असतात.
महिला राजसत्ता आंदोलनातून शिकले
मला चूल आणि मूल न करता आपणही समाजात राहून काही वेगळे काम करू शकतो, म्हणून मी राजकारणात आली. सरपंच झाली आणि गावाच्या हितासाठी आता कोरोना काळात पुरुष व महिला हा भेद दूर सारून पाठीवर फवारणी यंत्र घेऊन संपूर्ण गावात फवारणी केली. महिला राजसत्ता आंदोलनाच्या अकोला तालुका संघटिका मंगला सिरसाट यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मला लाभते.
– चित्राताई वानखडे, सरपंच