सारंग कराळे
व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: ऐतिहासिक शहर औरंगाबाद या शहराचे नाव छत्रपती संभाजी नगर व्हावे याकरिता गेली कित्येक वर्षांपासून शिवप्रेमी प्रयत्नात आहेत.त्यासाठी सोशल मीडिया च्या माध्यमातून वेगवेगळ्या पोस्ट मधून ते समर्थन करत असतात.या शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. त्याबाबत प्रत्येक मराठी माणसाला अभिमान आहे व त्याबाबतची माहिती जाणून घेण्याची जिज्ञासा प्रत्येकाला आहे.
त्यातीलच एक शिवप्रेमी ग्रुप जो विदर्भाच्या मातीतील असून त्यांनी जनतेच्या भावनेचा आदर करत स्वयंस्फूर्तीने पुढे येत औरंगाबाद या शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करावे यासाठी शिवसेना गटनेते शिवप्रेमी मनीष रामाभाऊ कराळे यांच्या मुख्य मार्गदर्शनात एक ६ मिनिटांचा लघुपट तयार केला असून या लघुपटाचे दिग्दर्शन निखिल आवारे यांनी केले आहे. या लघुपटाचे निर्माता व लेखक कुलदीप चांदणे हे आहेत. या लघुपटाची शूटिंग विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील रुख्मिनी मातेचे माहेर असलेले कौडंण्यपूर या ऐतिहासिक गावात झाली असून यामध्ये मुख्य कलाकार म्हणून वैभव कराळे आहेत. तर आईच्या भूमिकेत अर्चना पोफळे व वडिलांच्या भूमिकेत उमेश पोफळे हे आहेत. यासोबत उत्कर्षा चौधरी, वैभव आसलकर, सागर उगले, दर्शन आगरकर, पंकज वानखडे यांनी सुद्धा कलाकार म्हणून महत्त्वाचे पात्र साकारले आहेत.
या प्रेरणादायी लघुपटाच्या चित्रीकरणाची जबाबदारी ही विठ्ठल खराबे तसेच इडिटिंग व संगीत अभिजित गावंडे यांनी दिले आहे. मराठी जनतेच्या भावना लक्षात घेऊन ‘संभाजीनगर’ हा लघुपटाचा उपक्रम हाती घेतला आहे असे शिवसेना गटनेते मनीष रामाभाऊ कराळे यांनी कळविले आहे.या प्रेरणादायी लघुपटाचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार हा सोशल मीडिया तसेच वर्तमानपत्राद्वारे व्हावा यासाठी प्रत्येक मराठी तसेच शिवप्रेमींनी प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन सर्व कलाकार मंडळींनी केले आहे.
ग्रामिण कलाकरांचा सहभाग
केसी फोटोग्राफी या युट्यूब चॅनलवर हा लघुपट अपलोड करण्यात आला आहे. ग्रामीण पातळीपासून ते चित्रपट सृष्टी पर्यंत पोहचण्यासाठी अनेक ग्रामीण कलाकार आपल्या मनात आशा बाळगून असतात की एक दिवस त्यांच्या कलेची कदर होईल व त्याची फलश्रुती त्यांना चित्रपट क्षेत्रात ओळख मिळेल. पण या प्रेरणादायी प्रोजेक्ट्स ला पूर्ण करण्यासाठी ज्या विदर्भातील ग्रामीण कलाकार लोकांनी आपले योगदान दिले आहे. ते निस्वार्थ भावनेने दिले असून त्यामागे केवळ आणि केवळ शिवप्रेम आहे.या लघुपटात ग्रामीण कलाकारांनी आपले अभिनय कौशल्य दाखवत संबधित विषयाला स्पर्श करण्याची ताकद बाळगणारा हा लघुपट एक प्रभावी ठरला आहे असे दिसून येते.
सर्वांचेच योगदान महत्वपूर्ण
एखादा विषय कमीतकमी वेळात प्रेक्षकांसमोर कसा मांडावा याचे कसब ह्या लघुपटातून दिसून येते. हा प्रेरणादायी लघुपट महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपर्यांत पोहचावा. जेणेकरून ‘छत्रपती संभाजी महाराज’ व या शहराची कीर्ती मराठी व इतर जनसामान्यांत पोहचणार. या लघुपटात कलाकारांनी अभिनय,पर्सनल एक्स्प्रेशन, टेक्नॉलॉजी या सर्वांचा उपयोग करून आपले छोटे छोटे योगदान दिले आहे.