सक्तीच्या वीज वसूलीने एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

0
512

व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: महावितरणमार्फत सक्तीने वीज बिल वसुली होत आहे. विज बिल न भरल्यास वीज पुरवठा खंडित करणे सुरू असल्याने तेल्हारा तालुक्यातील गोर्धा येथील एका इसमाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे. शेवटी सामंजस्याने प्रकरण मिटले.
घटनेमुळे शासनाने आर्थिक कोंडीत सापडलेल्या गोरगरीब जनतेची वीजबिल माफ करणे गरजेचे असल्याची बाब अधोरेखित झाली आहे. हिवरखेड येथील महावितरण अंतर्गत येणा-या अनेक गावातील अनेक वीज ग्राहकांची देयके मागील एक वर्षापासून प्रलंबित आहेत. मागील वर्षी लागलेल्या 22 मार्चच्या लॉकडाऊन पासून आतापर्यंत अनेक नागरिकांचा रोजगार हिरावल्यामुळे सामान्य जनता प्रचंड आर्थिक कोंडीत सापडलेली आहे. त्यावेळी शासनाच्या विविध मंत्र्यांनी वेळोवेळी केलेल्या विधानांमुळे आणि विरोधी पक्षाच्या मागणीमुळे सगळीकडे एकच चर्चा होती की वीज बिल पूर्ण अथवा अर्धे माफ होईल अशी आशा जनतेला लागली होती. त्यामुळे बहुतांश लोकांनी बिल भरले नाही.

चार दिवसांपूर्वी महावितरणचे पथक उपअभियंता कुमार यांच्या नेतृत्वात वीज बिल वसुलीसाठी गोर्धा येथे गेले. एका व्यक्तीला वीज बिल भरण्यासाठी सक्ती केली. विज बिल न भरल्यास वीज  पुरवठा खंडित करण्याचे फर्मान सोडले. त्यामुळे या व्यक्तीने वीज पुरवठा खंडित केल्यास मी फाशी घेऊन आत्महत्या करेल अशी धमकी दिली. तरीही महावितरणच्या कर्मचा-यांनी वीज पुरवठा खंडित करण्यासाठी खांबावर चढणे सुरू केले. शेवटी हतबल झालेल्या व्यक्तीने थेट विद्युत खांबा जवळच गळफास घेण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात त्याच्या पत्नीने एकच टाहो फोडल्याने काही लोकांनी त्याला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले. आणि पुढील अनर्थ टळला. शेवटी नाईलाजास्तव वीज पुरवठा खंडित न करता कर्मचा-याला खाली उतरावे लागले.
ग्राहकाची काढली समजूत
महावितरणच्या पथकाने हिवरखेड पोलीस स्टेशनला धाव घेऊन ठाणेदारांना घटनेची माहिती दिली. ठाणेदार धीरज चव्हाण यांच्या नेतृत्वात हिवरखेड पोलीस स्टेशन चे पथक गोर्धा येथे पोहोचले. सरपंच तंटामुक्ती अध्यक्ष आणि गावातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतमध्ये बैठक झाली. आत्महत्या करणा-या व्यक्तीचे समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर त्याने अर्धे बिल भरले. सर्वांच्या सामंजस्याने हा विषय मिटला.

Previous articleहिवरखेड पोलिसांकडून आदीवासी महिलेची तक्रार घेण्यास टाळाटाळ
Next articleअकोल्यात वृद्ध व दुर्धर रुग्णांना कोविड लसीकरणास आरंभ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here