मंगेश फरपट
वºहाड दूत आॅनलाईन
बुलडाणा: जिल्हयाची पत्रकारिता प्रशासनाला गतिमान करणारी असून जिल्हयातील विविध प्रश्न मार्गी लावण्यात वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया महत्वपूर्ण भूमिका पार पाडत आहे. जिल्हयातील आरोग्यदायी नैसर्गिक वातावरण भुरळ घालणारे आहे. विविध गट तट आणि सर्वांना सांभाळून घेऊन हातात हात घालून होणारी राजकीय वाटचाल हे कुठेही न दिसणारे दुर्मिळ चित्र बुलडाण्यात बघायला मिळाले. मातृतीर्थ जिल्ह्यात घालवलेला कालावधी कायम स्मरणात राहील अशा शब्दात जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी जिल्हा वासियांचे आभार मानले.
शुक्रवारी, पोलीस अधीक्षक कार्यालयात यवतमाळ येथे बदली झालेले डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांचा निरोप समारंभ पार पडला. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्र काळे, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अरुण जैन, कार्याध्यक्ष चंद्रकांत बर्डे, गणेश निकम, प्रशांत खंडारे, दिपक मोरे, निलेश जोशी, सिद्धार्थ अराख, पुरुषोत्तम बोर्डे, लक्ष्मीकांत बगाडे आदी पत्रकार बांधव उपस्थीत होते.
लोकाभिमुख अधिकारी म्हणून ओळख
जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी पोलिस दल गतिमान करण्यासोबतच अनेक सामाजिक उपक्रम राबवले. कोरोनाकाळातील त्यांचे योगदान महत्वाचे ठरले. श्रीमती निरुपमा डांगे, सुमनचंद्रा या दोन महिला जिल्हाधिकारी यांचेसह श्री. मदन येरावार, डॉ. संजय कुटे, डॉ. राजेंद्र शिंगणे या 3 पालकमंत्र्यांसोबत त्यांनी काम केले. प्रशासकी आणि राजकीय दोन्ही पातळ्यांवर काम करतांना सकारात्मक दृष्टीकोन त्यांचा स्थाई भाव कायम होता.
सैलानी यात्रा एक मोठी यात्रा देशातच नव्हे तर देशाबाहेरून लोक या यात्रेसाठी येतात, जेव्हा यात्रा रद्द झाली तेव्हा तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असताना त्यांच्या मार्गदर्शनात हे प्रकरण अत्यंत संयमाने हाताळल्या गेले. राजकीय नेत्यांसोबत त्यांनी समन्वयाने काम करून कुठलेही मतभेद किंवा टोकाची भूमिका निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली हे उल्लेखनीय.