खामगाव: जिल्हयातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कसोशिने प्रयत्न करीत आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेची अंमलबजावणी सुरु झाली असून जिल्हयातील प्रत्येक कुटूंबाच्या घरी जावून आरोग्य विभागाचे कर्मचारी वैद्यकीय तपासणी करतांना दिसत आहे.
मोहिमेची पहिली फेरी 15 सप्टेंबर ते 10 आॅक्टोंबर या कालावधीत होणार आहे. या मोहिमेमध्ये सर्व लोकसंख्येला दोन वेळा घर भेटी देऊन संशयीत कोविड रूग्ण शोधणे, मधुमेह, हृदयविकार, किडनी आजार व लठ्ठपणा यासारख्या कोमॉरबीड व्यक्ती शोधणे, त्यांची तपासणी करणे, उपचार करणे या बाबींचा अंतर्भाव असणार आहे. खामगाव तालुक्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत तपासणीचा शुभारंभ शिरसगाव देशमुख येथे आज सकाळी करण्यात आला.
रोहणा आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिक्षक डॉ.संगीता इंगळे यांच्या उपस्थितीत माजी सरपंच बळीराम वानखडे यांची आॅक्सिजन लेव्हलसह शरिराचे तापमान तपासण्यात आले. या वेळी आशा स्वयंसेविका सौ. नैना तायडे, आरोग्य कर्मचारी शारदा खंडेराव उपस्थीत होते. आज दिवसभर गावातील प्रत्येक कुटंूबातील सदस्यांची तपासणी केली जाणार असल्याचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संगिता इंगळे यांनी सांगितले.
प्रत्येकाने करून घ्यावी तपासणी : बळीराम वानखडे
आपल्या आरोग्यासाठी शासन आपल्या दारी आले आहे. मोहिमेचे महत्व लक्षात घेवून प्रत्येकाने घरीच थांबावे. आपल्या कुटंूबातील सदस्यांची तपासणी करून घ्यावी असे आवाहनही माजी सरपंच बळीराम वानखडे यांनी नागरिकांना केले आहे.