- मास्क न वापरणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, सोशल डिस्टसिंगचे पालन न केल्यास दंड
- व्यापारी संघटना, नागरिक संघ, खाजगी संस्थांनी मोहीम कालावधीत बंद पाळावा
जिल्हा प्रतिनिधी
वऱ्हाड दूत ऑनलाईन
बुलडाणा : जिल्ह्यात ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहीमे’ची पहिली फेरी 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोंबर 2020 या कालावधीत होणार आहे. या मोहिमेमध्ये सर्व लोकसंख्येला दोन वेळा घर भेटी देऊन संशयीत कोविड रूग्ण शोधणे, मधुमेह, हृदयविकार, किडनी आजार व लठ्ठपणा यासारख्या कोमॉरबीड व्यक्ती शोधणे, त्यांची तपासणी करणे, उपचार करणे या बाबींचा अंतर्भाव असणार आहे. तरी सदर मोहीम सुरू असताना नागरिकांनी महत्वाच्या कामाव्यतीरिक्त घराबाहेर पडू नये. सर्वेक्षणाचे वेळी घरी नसल्यामुळे धोका ओळखता येत नसल्याने ही बाब सर्वेक्षणासाठी असहकार्य असल्याचे समजण्यात येवून नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचा आदेश जिल्हादंडाधिकारी एस. राममूर्ती यांनी मोहीम कालाधिसाठी लागू केला आहे.
आदेशानुसार कोणत्याही कारणासाठी सार्वजनिक ठिकाणी वावरतांना तीन पदरी मास्क किंवा साधा कापडी मास्क, रूमालाने नाक व तोंड झाकून वावरणे बंधनकारक आहे. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यकतेप्रमाणे अत्यावश्यक सेवा वगळता, दुकाने / आस्थापना/ प्रतिष्ठाने बंद व्यापारी संघटना, नागरीक संघ, खाजगी संस्था यांना 30 सप्टेंबर पर्यंत आपआपली दुकाने, आस्थापना बंद ठेवून मोहीमेस सहकार्य करावे.
दुकान चालक, मालक यांनी दुकाने उघडी ठेवल्यास सोशल डिस्टसिंगचे पालन करून एकावेळी 5 पेक्षा जास्त ग्राहकांना प्रवेश देवू नये. कामाचे, व्यवसायाचे ठिकाणी थर्मल स्क्रिनींग करणे, हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणेआदी बंधनकारक राहणार आहे. तसेच नियमांचे पालन न केल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांनी दंडनिय कार्यवाही करावी. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क न वापरणे, सोशल डिस्टसिंगचे पालन न करणे याबाबत शहरी भागात मुख्याधिकारी, नगर परीषद व ग्रामीण भागात मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प बुलडाणा यांनी दंडनिय कारवाई करावी. त्यासाठी जागोजागी चेकनाके उभारावे. थुंकणे व मास्क न वापरल्यास 500 रूपये दंड व सोशल डिस्टसिंगचे पालन न केल्यास ग्राहकांसाठी 500 आणी दुकान मालकासाठी 1500 रूपये दंड आकारण्यात येणार आहे. आदेश कालावधीत जिल्हाधिकारी ,अप्पर जिल्हाधिकारी बाहेर फिरून आदेशाची अंमलबजावणी होत आहे किंवा नाही याची पाहणी करणार आहे. अकस्माक भेटी देवून परिस्थितीची चाचपणी करणार आहे. दोषी आढळल्यास दोषिंवर कारवाई करणार आहेत.
शासनाचे निर्देशानुसार जिल्ह्यामध्ये कोविड 19 च्या अनुषंगाने ही तपासणी मोहिम राबविण्यात येत असून यामध्ये नागरीकांची घरोघरी तपासणी करण्यात येणार आहे. सदर तपासणीदरम्यान नागरीकांनी घरीच थांबावे व तपासणी करून पथकास योग्य ते सहकार्य करावे. तसेच 65 वर्षावरील व्यक्ती, कोमॉबीड व्यक्ती, गरोदर माता व 10 वर्षाखालील मुले यांनी वैद्यकीय तथा अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. या आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्तिंविरूद्ध दंडनिय तसेच फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. या आदेशाद्वारे विहित करण्यात आलेल्या कोणत्याही निर्बंधाची किंवा सदर आदेशाची अवज्ञा करणारी कोण्तीही व्यक्ती, संस्था अथवा संघटना ही आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथरोग अधिनियम 1897 व भारतीय दंड संहीता च्या कलम 188 नुसार कायदेशीर कारवाईस पात्र राहील.