अकोल्यात होणार कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी!

0
462

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला :कोरोनाच्या संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या कडक अंमलबजावणीसाठी महसूल, पोलीस व स्थानिक स्वराज्य संस्था यांचे संयुक्त पथक गठीत करुन नियमांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे दिले.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला अटकाव करण्याबाबत आज जिल्हाधिकारी पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख प्रशासकीय यंत्रणांची बैठक जिल्हाधिकारी यांच्या दालनात पार पडली. यावेळी मनपा आयुक्त निमा अरोरा, पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.
यावेळी कोरोना संसर्गाच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन, प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीबाबत विचारविनिमय करण्यात आला.

मास्कचा वापर, व्यक्ति व्यक्तिंमधील परस्पर अंतर राखणे व सॅनिटायझर वा हात धुणे या बाबींचा अवलंब करणे आवश्यक आहे. असे असतांना शहरात वा अन्यत्र सर्रासपणे लोक घोळके करुन उभे असतात. हॉटेल्स, चहा स्टॉल, कौटुंबिक सोहळे तसेच अन्य कार्यक्रमांच्या निमित्ताने होणाऱ्या गर्दीत नियमांचे पालन व्हावे. मर्यादित संख्येतच लोक एकत्र यावेत, दुकाने, विविध आस्थापनांमध्ये जिथे लोक एकत्र येतात तेथे या नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी अधिक कडकपणे व्हावी व या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवृत्तींना आळा बसावा यासाठी महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्था ( महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत इ.) यांचे संयुक्त पथक तैनात करुन कारवाई करण्यात यावी. ज्या व्यावसायिक प्रतिष्ठानांवर नियमांचे उल्लंघन होतांना दिसून येईल तेथे दंडात्मक कारवाई करण्यात यावी,असे निर्देश जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले.

Previous articleया बँकांचे होणार खासगीकरण, यात तुमची बँक तर नाही ना!
Next articleमहामार्गाचे प्रकल्प अहवाल बनवणारे निम्मे अभियंतेच बोगस! – नितीन गडकरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here