वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: कोरोना वरील प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी जिल्ह्यात 16 जानेवारीपासून सुरू करण्यात आलेल्या कोरोना लसीकरण मोहिमेत आतापर्यंत 9 हजारांवर लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. दरम्यान, सोमवार, 15 फेब्रुवारी रोजी उर्वरित 265 लाभार्थ्यांना पहिला डोस देण्याचे नियोजन करण्यात आल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवकांसोबतच शासनाच्या निर्देशानुसार फ्रंटलाईन वर्कर्सचीही नोंदणी सुरू करण्यात आली. आतापर्यंत आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, परिचारिकांसह विविध क्षेत्रातील फ्रंटलाईन वर्कर्स मिळून आतापर्यंत 18 हजार 500 च्या जवळपास लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली आहे. आरोग्य सेवकांसोबतच फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरणही सुरू करण्यात आले आहे. 16 जानेवारीला पहिला डोस घेतलेल्या लाभार्थ्यांना आता दुसरा डोस देण्यात येणार आहे. त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या डोसच्या लाभार्थ्यांसह दोन टप्प्यातील लाभार्थ्यांना एकत्रच लस देण्यात येणार असल्याने यंत्रणेवरील ताण आणखी वाढण्याची शक्यता आहे.