गॅस दरवाढीच्या विरोधात महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे भाकरी थापा आंदोलन दरवाढ मागे घेण्याची मागणी.. यापुढे पेट्रोल पंपावरील बॅनर काढण्यासाठी महिला रस्त्यावर – रुपाली चाकणकर
वर्हाड दूत न्यूज नेटवर्क वाशीम: सतत वाढत असलेल्या गॅस दराच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला महिला पदाधिकार्यांनी प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या नेतृत्वात येथील अकोला नाका येथे रस्त्यावर चुल पेटवून तसेच हाती गोवर्या घेवून गॅस दर वाढीचा निषेध करत भाकरी थापा आंदोलन केले. तसेच दरवाढ कमी करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, महिला जिल्हाध्यक्ष शुभदा नायक, सोनाली ठाकूर, युवती जिल्हाध्यक्ष नुतन राठोड यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला पदाधिकार्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी महिलांनी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. अकोला नाका येथे रस्त्यावर चुल पेटवून भाकरी थापा आंदोलन केले. यावेळी रूपाली चाकणकर यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच मोदी सरकार हे जुमलेबाजीचे सरकार आहे. केवळ विकास झाल्याचा भास करत सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचे काम करीत आहे. चारशे रूपयाचा गॅस आता तब्बल सातशे पन्नास रूपयावर गेला आहे. यातून हे सरकार सर्वसामान्याची लुट करीत केवळ विकास झाल्याचे दाखवित आहे. मोदी सरकारने गोरगरिबांना फुकटात गॅॅस वाटप केल्याचा दिंडोरा पेटविला आहे. मात्र गॅस दरवाढ किती झाली. याकडे या सरकारचे लक्ष नाही. सर्वसामान्यांना आता गॅस घेणे परवडत नसल्याने सामान्य लोकांचे आता ‘नको आम्हाला अच्छे दिन लोटादो हमारे पुराने दिन’ असे म्हणत गॅस दरवाढीचा निषेध केला. यावेळी मोठया प्रमाणात मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
यापुढे पेट्रोल पंपावरील बॅनर काढण्यासाठी महिला रस्त्यावर
मोदी सरकार गोरगरिबांना गॅस वाटप केल्याची जाहिरातबाजी करीत देशातील प्रत्येक पंपावर दिशाभुल करणारे मोठे बॅनर लावले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आता गॅस दरवाढीच्या विरोधात रस्त्यावर उतरून चुल पेटविण्याचे आंदोलन करीत आहेत. गॅस दरवाढ कमी न झाल्यास यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रत्येक पेट्रोलपंपावरील बॅनर काढण्यासाठी रस्त्यावर उरतील .अशा इशारा त्यांनी दिला. तसेच अर्थमंत्री निर्मला सितारमण ह्या महिला असतांनाही त्यांनी महिलांच्या विकासासाठी कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. पूर्वी महिला विकासासाठी असलेल्या महिला सक्षमीकरणाच्या योजना हे सरकार बंद करीत आहे. गरिबांना आणखीच गरीब करण्याचा या सरकारचा डाव असून केवळ विकासाच्या थापा मारणारे हे सरकार असल्याचा घणाघातही त्यांनी यावेळी केला.