अकोल्यात ‘बर्ड फ्लू’ची ‘एन्ट्री’! – पिंपळगाव चांभारे येथील पोल्ट्री फार्म परिसर प्रतिबंध क्षेत्र घोषित

0
318

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क

अकोला: बार्शीटाकळी तालुक्यातील पिंपळगाव चांभारे येथील सुरेश बाबाराव सुरडकर यांच्या परसातील पोल्ट्री फार्ममधील एका कोंबडीचा 21 जानेवारी रोजी मृत्यू झाला होता. तिचे नमुने पुणे येथे पाठविण्यात आले होते. तेथून तो नमुना भोपाळला पाठविण्यात आला होता. हा नमुना बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. गजानन दळवी यांनी दिली. या घटनेने अकोला जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचे उघडकीस आले असून, या रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होवू नये यासाठी सुरडकर यांच्या पो‍ल्ट्री फार्मपासून 10 किलोमीटरच्या त्रिज्या परिसराला सतर्क क्षेत्र घोषित करण्यात आले असल्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी 26 जानेवारीला निर्गमित केले आहेत. दरम्यान,  पिंपळगाव चांभारे गावात पशुसंवर्धन विभागाचे शीघ्र प्रतिसाद पथक दाखल झाले असून, नागरिकांनी घाबरुन जावू नये, असे आवाहन डॉ. दळवी यांनी केले आहे. दरम्यान, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. तुषार बावणे, सहायक आयुक्त राठोड, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दळवी हे जिल्ह्यातील सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.
मौजे पिंपळगाव चांभारे या बाधित क्षेत्रातील सर्व कुक्कूट पक्षांची तसेच निगडीत खाद्य व अंडी यांचीही शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्याबाबत शीघ्र प्रतिसाद दलास आदेशित करण्यात आले आहे. त्यानुषंगाने प्रसार प्रतिबंधात्मक उपायोजना करण्यासाठी तालुका निहाय समिती उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आली आहे. परिसरातील कुक्कूट शेड निर्जंतुकीकरण करुन 10 किलोमीटर त्रिज्या परिसरातील कुक्कूट पक्षांची खरेदी, विक्री, वाहतूक, बाजार व जत्रा प्रदर्शन करण्यास पुढील 21 दिवसापर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे.

Previous articleबुलडाण्यात बर्ड फ्लू ची एन्ट्री! पशुपालकांनी दक्षता घेण्याचे आवाहन
Next articleखामगावातील 97 ग्राम पंचायतीचे सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here