आज सार्वपित्री अमावस्या
म्हणजे पितृपंधरवाड्याचा शेवटचा दिवस. भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्ष म्हणजे पितरांचे स्मरण करुन त्यांना संतुष्ट करण्याचा काळ . ह्या दिवसांमध्ये शुभकार्य,खरेदी -विक्रीचे व्यवहार करू नये असे समज आहेत. त्यामुळे पितृपक्ष म्हणजे स्लॅक सिझनच जणू…. अशुभ संकेत देणारा.
ज्या पूर्वजांमुळे आपल्याला हा जन्म लाभला त्या स्वर्गातील पितरांना गोडधोड पदार्थ तयार करून खाऊ घालत तृप्त करण्याचा हा पक्ष . हे गोडधोड पितरांपेक्षा इतरांनाच जास्त तृप्त करुन जाते . ताटात अनेक गोड -धोड पदार्थांची रेलचेल. अशा ह्या पंधरा दिवसांच्या संतुष्टीचा समारोप आजच्या सार्वपित्री अमावस्येने होत असतो.
मोठ्यांप्रती आदर, कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा असलेली आपली संस्कृती .परंपरांचे सोहळे करताना त्यातील ओलावा कमीकमी होत जाऊन औपचारिकतेने त्यावर कुरघोडी केली. चिकित्सा न करता परंपरांचे हस्तांतरण करत राहणे यात धन्यता मानल्या जाऊ लागली. त्यामुळे घरातील ज्येष्ठ माणसांना जपण्यापेक्षा फ्रेममधल्या प्रतिमांपुढे जीवाभावाने नतमस्तक होण्याचे महत्त्व वाढले.
कावळ्याने पिंड किंवा नैवेद्याला स्पर्श केला की आमच्या पितृभक्तीचे सार्थक अन्यथा पातक अशी धारणा आम्ही करून घेतली आहे. विज्ञान युगातही इतकं आंधळं करुन ठेवण्यात ही व्यवस्था यशस्वी झाली आहे.
कावळ्यात पूर्वजांना पाहण्यासाठी विवेकावर भितीचे पध्दतशीर पांघरुण घातल्या गेलं आहे. त्यामुळे गाडगेबाबांचा माणसातला देव ओळखायला उशीर होत आहे. कावळ्यासारख्या पक्ष्यांचे महत्त्व सृष्टीचक्राच्या संतुलनासाठी आणि पितृपक्षाचे महत्त्व घराघरातील ज्येष्ठांना त्यांच्या हयातीत जपण्यासाठी, त्यांच्या सन्मानासाठी, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे, असं आपण मान्य केलं तर पितृपंधरवाडा जास्त प्रभावी होईल. अशा प्राचीन रुढी परंपरांना काळ आणि विवेकाच्या कसोटीवर तपासत माणसाच्या मनात प्रेमाचा प्रकाश निर्माण होण्यास मदत होईल.
आजच्या सार्वपित्री अमावस्येच्या निमित्ताने असा विवेकी प्रकाश निर्माण व्हावा, ही प्रार्थना !
– अरविंद शिंगाडे
खामगाव जि. बुलडाणा
(9423445668)