व-हाड दूत न्युज नेटवर्क
बुलडाणा (जिमाका) : जिल्ह्यात 498 ग्रामपंचायतीसाठी आज 15 जानेवारी रोजी मतदान पार पडले. या मतदानातून 3 हजार 891 उमेदवारांचे भाग्य मशीनबंद करण्यात आले. जिल्ह्यात सर्वत्र शांततेत व उत्साहात मतदान पार पडले. सकाळपासूनच मतदारांचा उत्साह या गावपातळीवरील लोकशाहीच्या उत्सवात दिसला. या मतदानाची मतमोजणी 18 जानेवारी रोजी संबंधीत तहसिल कार्यालयात होणार आहे. आज झालेल्या मतदानात दुपारी 3.30 वाजेपर्यंत 63.84 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. मतदानाची वेळ सायं 5.30 पर्यंत असल्यामुळे अंतिम आकडेवारी उशिरा प्राप्त होणार आहे.
जिल्ह्यात या मतदानासाठी 4 लक्ष 82 हजार 458 स्त्री मतदार तर 4 लक्ष 88 हजार 209 पुरूष मतदार होते. एकूण 9 लक्ष 70 हजार 667 मतदार संख्या होती. त्यापैकी दुपारी 3.30 वाजेपर्यंत 3 लक्ष 11 हजार 312 स्त्री मतदारांनी तर 3 लक्ष 8 हजार 323 पुरूष अशा एकूण 6 लक्ष 19 हजार 635 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजाविला. या मतदानाची स्त्री मतदारांची टक्केवारी 64.53, पुरूष मतदारांची 63.15 एकूण टक्केवारी 63.84 आहे.