वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा: मराठा सेवा संघाच्या वतीने देण्यात येणा-या सर्वोच्च मराठा विश्वभुषण पुरस्काराने राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना सन्मानित करण्यात आले. जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त मातृतिर्थ सिंदखेड राजा येथे जिजाऊ सृष्टीवर मंगळवारी हा सोहळा पार पडला.
यावेळी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर, पालकमंत्री शिवश्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आ. श्वेता महाले, माजी आमदार रेखा खेडेकर, राकाँचे जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी आदी मान्यवर उपस्थित होते. ना. टोपे यांनी आपल्याला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आभार व्यक्त केले. बुलडाण्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला मेडिकल कॉलेजचा विषय नक्की मार्गी लागेल अशी ग्वाही दिली. यावेळी आमदार श्वेताताई महाले,संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ता गंगाधर बनवरे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष अर्जुन तनपुरे जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष, माधुरीताई भदाणे आदींनी आपले विचार मांडले. यावेळी अंध असलेल्या आय एस अधिकारी प्रांजल पाटील यांनीदेखील ऑनलाइन मार्गदर्शन केले. यानंतर शाहीर रामदास कुरंगळ यांना मराठा शाहीर पुरस्कार, आयएएस अधिकारी शिवश्री प्रांजल पाटील यांना जिजाऊ पुरस्कार तसेच एस के सूर्यवंशी यांना पुरस्कार देण्यात आला.
जिजाऊ विकास आराखड्यासाठी ६०० कोटीचा निधी: डॉ. राजेंद्र शिंगणे
जिजाऊ विकास आराखड्यासाठी देवेंद्र फडवणीस हे मुख्यमंत्री असताना 250 कोटी रुपयांचा विकास आराखडा आणि त्यानंतर साडे तीन कोटीचा विकास आराखडा मांडला गेला होता या दोन्ही विकास आराखड्यासाठी मंत्रालय मुख्यमंत्र्यांसोबत लवकरच बैठक लावून विकास आराखड्याला मंजूर करण्यात येईल अशी शाश्वती पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली.