पक्षी पालकांनी खबरदारी बाळगण्याचे आवाहन
वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला- जिल्ह्यात कुठेही बर्ड फ्ल्यू या पक्षांना होणाऱ्या आजाराचा प्रादुर्भाव दिसून आलेला नसल्याने नियमित रोगनिदान सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. तथापि जिल्ह्यातील पोल्ट्री फार्म चालक, पशुपालक यांनी मात्र खबरदारीच्या उपाययोजना राबवाव्या,असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
बर्ड फ्ल्यू संदर्भात बाळगावयाच्या खबरदारी संदर्भात आज जिल्हाधिकारी पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. तुषार बावने, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. गजानन दळवी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.
यावेळी माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात आतापर्यंत पोल्ट्री फार्म मधील ३५० पक्षांचे सिरो (नासिकाग्रातील स्त्राव) नमुने रोग अन्वेषण विभाग, औंध पुणे येथे पाठवण्यात आले. हे सर्व नमुन्यांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्यावरुन जिल्ह्यात कुठेही बर्ड फ्ल्यू नाही, असा निर्वाळा डॉ. बावने यांनी दिला. तसेच शासनाच्या निर्देशानुसार पुन्हा जिल्ह्यातील १२ वेगवेगळ्या ठिकाणच्या १३० पक्षांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. त्यासाठी पशुवैद्यकांची आठ पथके तयार करण्यात आली आहेत, अशीही माहितीही दिली.
तथापि, या संदर्भात जिल्हाधिकारी पापळकर यांनी आवाहन केले आहे की, जिल्ह्यात कुठेही पक्षांची अचानक व मोठ्या प्रमाणात मरतुक दिसल्यास शेतकरी, पशुपालकांनी, पोल्ट्री चालकांनी त्याची माहिती तात्काळ नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यास द्यावी. पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांनी रोजच्या व आठवडी बाजारात विशेष सर्वेक्षण मोहिम राबवावी. पोल्ट्री फार्म असलेल्या भागात विशेष लक्ष द्यावे. प्रत्येक ग्रामपंचायतीमार्फत धुण्याचा सोडा (सोडियम कार्बोनेट) एक लिटर पाण्यात सात ग्रॅम या प्रमाणे द्रावण तयार करुन कोंबड्यांची खुराडे, गुरांचे गोठे, गटारे, नाल्या, पशु-पक्ष्यांचा वावर असलेला भाग याठिकाणी १५ दिवसांच्या अंतराने तीन वेळा फवारणी करावी. जिल्ह्यात बाहेरुन येणारे पक्षी ज्या ठिकाणी येतात तेथे वारंवार सर्वेक्षण करण्यात यावे. पोल्ट्री फार्म चालकांनी पोल्ट्री फार्म मध्ये स्वच्छता ठेवावी, वाहतुक, मलमुत्र व्यवस्थापन इ. बाबत अधिक खबरदारी व स्वच्छता उपाययोजना राबवाव्या. पक्षी मृत पावल्यास त्यांचे मृतदेह हे उघड्यावर न टाकता, ते जमिनीत खोल खड्डा करुन पुरावे, अशा सुचना देण्यात आल्या आहेत.