वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: भंडारा येथील शासकीय रुग्णालयात घडलेल्या भीषण आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर रूग्णालयात उपलब्ध असलेल्या अग्निशमन यंत्रणेचा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना वापर करता यावा, या उद्देशाने जिल्हा स्त्री रुग्णालयात ‘फायर मॉक ड्रील’ करण्यात आले.
दुर्घटना रोखण्याच्या उद्देशाने जिल्हा स्त्री रुग्णालयात सराव म्हणून ‘फायर मॉक ड्रील’चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुमारे ५० अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून संबंधितांना यावेळी प्रशिक्षण देण्यात आले. जिल्हा स्त्री रूग्णालयात अकोल्यासह शेजारच्या जिल्ह्यातील महिला रुग्ण उपचार आणि बाळंतपणासाठी येत असतात. या रुग्णालयाचे ‘इलेक्ट्रिकल फायर ऑडिट’ झाले आहे; मात्र ‘फायर फायटिंग अँड डिटक्शन सिस्टीम’ तेथे कार्यान्वित झालेले नाही. त्यामुळे भंडारा रूग्णालयासारखी दुर्घटना घडल्यास उपलब्ध साधन सामुग्रीच्या माध्यमातून परिस्थितीवर नियंत्रण मिळविता यावे, या उद्देशाने जिल्हा स्त्री रुग्णालयात ‘फायर मॉक ड्रील’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. अग्निशमन विभागाचे अधिकारी व कर्मचार्यांनी यावेळी आवश्यक खबरदारीच्या दृष्टीने उपस्थितांना मार्गदर्शन केले
रुग्णालयात असलेल्या अग्निशामक सीओ-2, ड्राय पावडर सिलींडर आणि एबीसीविषयी रुग्णालयातील कर्मचारी वर्गाला माहिती देण्यात आली. अडचणीच्या परिस्थितीत उपलब्ध साधनांचा समयसुचकतेने वापर करून आग कशी आटोक्यात आणावी, याबाबत प्रात्याक्षिकाद्वारे यावेळी माहिती देण्यात आली. रुग्णालयातील इलेक्ट्रीक साधने, नव्या इमारतीमधील सिक्युरिटी अलार्म, मुख्य स्वीच आदिंच्या नियंत्रणाबाबतही यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्हा स्त्री रुग्णालयात वर्षातून दोन वेळा ‘फायर मॉक ड्रील’ करण्यात येते. रुग्णालयात दुर्घटना घडू नये, आपत्कालिन काळात उपयोगी येणाऱ्या उपलब्ध साधनसामुग्रीची माहिती कर्मचाऱ्यांना व्हावी यासाठी ‘फायर मॉक ड्रील’ घेण्यात येत असतो, अशी माहिती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. आरती कुलवाल यांनी दिली.