वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला:राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 सह जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा, शेगाव या प्रमुख मार्गाचे काम रेंगाळत पडले आहे. यामुळे रात्री तर सोडाच पण दिवसासुद्धा प्रवास करणे असुरक्षीत ठरत आहे. रस्ता निर्मितीचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी जोर धरत आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मंजूर झालेली बरीच विकास कामे सध्या प्रलंबीत आहेत. यामध्ये प्रामुख्याने रस्त्यांची निर्मिती रखडली आहे. अकोला शहरातून खामगाव-मलकापूरकडे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 जातो. या रस्त्याचे काम मागील तीन वर्षापासून सुरु आहे. आयएलएफएस कंपनीने काम सोडल्यापासून कामाची गती मंदावली आहे. सध्या हे काम नव्याने देण्यासाठी तीन कंपन्यासोबत करार झाला आहे. अकोला ते मलकापूर या 100 किलोमिटरचा रस्ता अकोला ते खामगाव पर्यंत खोदून ठेवण्यात आला आहे. तीन तीन किलोमिटरवरील अंतरावर रस्त्याचे काम सुरु आहे. माती काम सुरु असल्याने रस्त्याच्या कडेला माती पडलेली राहते. यामुळे एका बाजूनेच वाहने चालू राहतात. यात कोणत्याही प्रकारची खबरदारी कंत्राटदाराकडून घेतल्या जात नसल्याचे दिसून येते. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याशिवाय अकोला ते शेगाव पालखी मार्गही खोदून ठेवला आहे. दोन्ही बाजूला मातीचा भराव टाकणे सुरु आहे. दिवसा तर या मार्गाने वाहन चालवणे मोठे जिकरीचे ठरत आहे. काही सामाजिक संघटनांनी जोपर्यंत पक्का रस्ता होत नाही तोवर वाहतूक बंद ठेवण्याचीही मागणी केली आहे. मात्र प्रशासनाकडून त्याला कुठलाही प्रतिसाद अद्याप मिळालेला दिसत नाही. यामुळे किरकोळ अपघात नित्याचेच झाले आहे.
अकोट मार्गावरील प्रवास जीवघेणा
अकोट मार्गाचे काम अर्धवट स्थितीत पडून आहे. देवरी फाटा ते अकोटपर्यंत जवळपास 12 किलोमिटर अंतर पार करणे वाहनधारकांना कसरत ठरत आहे. काही भागात रस्ता खोदून ठेवला आहे तर काही भागात गिट्टी व मुरूम टाकण्यात आला आहे. रस्त्याचे काम दोन्ही बाजूने एकाचवेळी केल्या जात असल्याने रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा तर होतच आहे. शिवाय गिट्टीमुळे वाहनांचे नुकसानही होत आहे.
तेल्हारा मार्गाचेही काम धिम्या गतीने
तेल्हारा मार्गाचे 8 ते 10 किलोमिटरील काम बाकी आहे. खडीकरण पुर्ण झाले आहे. मुरुमामुळे वाहन धारकांना धुळीचा सामना करावा लागतो. शिवाय दुचाकी चालवणे कठीण झाले आहे. दोन दिवसापूर्वी या भागात पाउस पडल्याने रस्त्यात काही ठिकाणी चिखल झाला आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी या मार्गाने प्रवास टाळण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.