कोविड १९: लसीकरणाचा सराव जिल्ह्यातील चारही केंद्रावर यशस्वी ठरली ‘सराव फेरी’

0
210

व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला:
कोविड लसीकरणाची रंगीत तालीम जिल्हा स्त्री रुग्णालय, अशोक नगर आरोग्य केंद्र, अकोला तसेच कान्हेरी सरप ता. बार्शी टाकळी येथिल प्राथमिक आरोग्य केंद्र आणि बार्शी टाकळी ग्रामिण रुग्णालय येथे व्यवस्थित पार पडली. ह्या सराव साखळीतील सर्व घटकांनी सर्व जबाबदाऱ्या यशस्वी पणे पूर्ण करुन जिल्ह्यातील चारही केंद्रावर यशस्वी सराव केला.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार ही सराव फेरी पार पडली. त्यासाठी सकाळी जिल्हा स्त्री रुग्णालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीत सराव फेरीचा प्रारंभ करण्यात आला. या लसीकरण केंद्राची फित कापून जिल्हाधिकाऱ्यांनी विधीवत प्रारंभ केला. यावेळी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश आसोले, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक आरती कुलवाल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या सराव फेरीत  राज्यस्तरावरुन जिल्ह्यांचे यूजर आयडी, जिल्हास्तरावरुन आरोग्य संस्थेचे व लसीकरण पथकाचे यूजर आयडी  यांचे कार्यान्वयन तपासण्यात आले. जिल्ह्यांनी  चाचणी लाभार्थ्यांची निवड करून कोविन अॅपमध्ये केलेले लसीकरण सत्र व त्याचे मॅपिंग करण्यात आले, चाचणी लाभार्थ्यांची माहिती कोविन पोर्टलवर अपलोड करुन, लाभार्थी व आरोग्य सेविकेचे सत्र स्थळ निश्चित केले, लस वाटप व शितसाखळी जोपासणे, कळविणे, आरोग्य सेविका, लसीकरण अधिकारी एक ते चार आणि पर्यवेक्षक यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून त्या ठरल्याप्रमाणे पार पाडण्यात आल्या.
या सर्व सराव फेरीच्या विविध टप्प्यांची जिल्हाधिकारी पापळकर व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष्य उपस्थित राहून पाहणी केली. ऑनलाईन पद्धतीने पार पाडावयाच्या प्रक्रिया बिनचुक पार पडल्या.
असा झाला सराव
लसीकरणासंबंधित डाटा संकलित केलेल्या  ‘कोविन 19’ मधील नोंदींनुसार  नोंदविलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा सराव करण्यात आला. यावेळी  लसीकरण करुन घेण्यासाठी नोंदणी कक्षात आलेल्या व्यक्तिस टोकन देऊन, नाव नोंदणी करण्यात आली. त्यानंतर ओळखपत्र वा आधार कार्डच्या आधारे नोंदणीची ऑनलाईन पडताळणी करण्यात आली. त्यानंतर लसीकरण कक्षात लस घेणाऱ्या व्यक्तीच्या सर्व शंकांचे निरसन करुन लस टोचण्याचा सराव झाला. त्यानंतर झालेल्या लसीकरणानंतर संबंधित व्यक्तिस काही परिणाम जाणवतात वा लक्षणे दिसतात का याबाबत निरीक्षण करण्यासाठी त्या व्यक्तीस निरीक्षण कक्षात ठेवण्यात आले. या सर्व टप्प्यावर लसीकरण अधिकारी व त्यांचे कर्मचारी तैनात होते.

Previous articleकृषि विद्यापीठात क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले जयंती साजरी
Next articleजिल्हा परिषद शाळेला लागली आग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here