नागपुरात यशस्वीपणे पार पडली लसीकरणाची ड्राय रन

0
283

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांचे मार्गदर्शन : अडचणींची नोंद घेण्याचे निर्देश

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोव्हिड विषाणूंवरील बहुप्रतीक्षित लसीकरणाची पूर्वतयारी म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार नागपुरात तीन ठिकाणी ‘ड्राय रन’ यशस्वीपणे पार पडली. नागपूर महानगरपालिकेच्या के.टी. नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या उपस्थितीत २५ जणांवर ‘ड्राय रन’च्या माध्यमातून लसीकरणाचे प्रात्यक्षिक करण्यात आले.

सकाळी ९ ते ११ या वेळात ही ‘ड्राय रन’ पार पडली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्यासह आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपाणे, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप सेलोकर, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे, समन्वयक डॉ. गोवर्धन नवखरे, अतिरिक्त सहायक आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, जागतिक आरोग्य संघटनेचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. साजीद खान, के.टी. नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. ग्रीष्मा अग्रवाल, आर.सी.एच. अधिकारी डॉ. वैशाली मोहकर, धरमपेठ झोनच्या झोनल आरोग्य अधिकारी डॉ. मंगला पुरी, फार्मासिस्ट सौरभ पाचपोर आदी उपस्थित होते.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी ‘ड्राय रन’ दरम्यान लसीकरणाच्या संपूर्ण प्रक्रियेची माहिती जाणून घेतली. शासनाच्या निर्देशानुसार करण्यात आलेल्या तयारीत काही त्रुट्या आहेत का, काही अडचणी आहेत का, ओळखपत्रानुसार लसीकरणासाठी नोंदणी करताना काही अडचणी येत आहेत का, याबाबत आरोग्य अधिकारी, कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली. ज्या काही त्रुट्या आहेत त्या दूर करा आणि अडचणी असतील तर त्याची नोंद करा, असे निर्देश दिले.

*कशी पार पडली ‘ड्राय रन’*

शासनाच्या निर्देशानुसार लसीकरणाची ट्रायल अर्थात ड्राय रन घेण्यात आली. ऑनलाईन पद्धतीने लसीकरणासाठी नोंदणी करण्यात आलेल्या २५ आरोग्य कर्मचाऱ्यांची आजच्या ‘ड्राय रन’ साठी निवड करण्यात आली होती. आरोग्य विभागातर्फे त्यांना त्यासंबधीचे संदेश प्राप्त झाले होते. लसीकरण केंद्रात सर्वात पहिल्या बाकावर संबंधितांनी संदेश दाखवून लसीकरणासाठी बोलविण्यात आल्याचे निश्चित केले. या व्यक्तींचे शरीर तापमान तपासण्यात आले. हात सॅनिटाईज करण्यात आले. त्यांना टोकन नंबर देऊन केंद्रातील प्रतीक्षा कक्षात त्यांना पाठविण्यात आले. प्रतीक्षा कक्षात सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करीत लसीकरणासाठी आलेल्या व्यक्तींना बसविण्यात आले. टोकन क्रमांकानुसार संबंधित व्यक्तीला लसीकरण कक्षात पाठविण्यात येत होते. प्रारंभी त्यांच्या ओळखपत्राच्या आधारे संबंधित व्यक्ती तोच असल्याची खातरजमा करण्यात आली. ओटीपीच्या आधारे त्यांना लसीकरणासाठी पात्र ठरविण्यात येत होते. यानंतर लसीकरण अधिकाऱ्याकडे त्यांना पाठविण्यात आले. लसीकरण अधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीला लसीकरणाची माहिती दिली. लस कोणत्या कंपनीची आहे, लसीकरणानंतर काय नियम पाळायचे आहेत, पुढील लस घेण्याकरिता किती दिवसांनी यावे लागेल, लसीकरणानंतर अर्धा तास निगराणीखाली थांबायचे, त्यानंतर घरी गेल्यावर काही अडचण आल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांना अथवा १०८ या टोल फ्री क्रमांकावर फोन करून माहिती देण्यास सांगितले. लसीकरणानंतर सिरींज कट करून ती संबंधित बीन मध्ये टाकण्यात आली. यानंतर लसीकरण झालेल्या व्यक्तीला निगराणी कक्षात अर्धा तासाकरिता बसविण्यात आले.

यासंदर्भात माहिती देताना आयुक्त राधाकृष्णन बी. म्हणाले, शासनाच्या निर्देशानुसार आज ‘ड्राय रन’ घेण्यात आली. शासनाच्या संपूर्ण दिशानिर्देशांचे येथे पालन करण्यात आले. यासंदर्भात आपण संपूर्ण पाहणी केली आणि आढावा घेतला असताना ही ‘ड्राय रन’ यशस्वीरीत्या पार पडल्याचेही ते म्हणाले. यासंदर्भात शासनाला अहवाल पाठविण्यात येणार असून पुढील दिशानिर्देशानुसार मनपा कार्य करेल, असेही त्यांनी सांगितले.

Previous articleलाल मुंग्यांची चटणी कोरोनावर ठरणार रामबाण उपाय!
Next articleकृषि विद्यापीठात क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले जयंती साजरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here