बुलडाणा,(जिमाका) दि.2 : मुलींच्या जन्माचे स्वागत करून समाजातील स्त्री भ्रुण हत्येचा कलंक पुसून टाकण्यात यावा. त्यासाठी मातृ संवर्धन दिवस साजरा करण्याची कार्यवाही करावी. मुलींच्या संख्येबाबत सुक्ष्म सर्वेक्षण करून अत्यंत काटेकोर नियोजनातून उपाययोजना कराव्यात, अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाची आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी श्री. रामरामे, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांच्यासह महिला व बालविकास विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कोणत्या तालुक्यात व विशेषत: कोणत्या गावात मुलींचे प्रमाण प्रती हजारी मुलांमांगे कमी आहे याबाबत सर्वेक्षण करण्याचे सांगत अप्पर जिल्हाधिकारी म्हणाले, यामधून अशा गावांमध्ये अभियानावर जास्त लक्ष केंद्रीत करता येईल. त्यामुळे स्त्री लिंग गुणोत्तर प्रमाण सम करण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे पोषण आहारासंदर्भात वितरणाचा अहवाल नियमितरित्या ग्रामपा तळीवरून घेण्यात यावा. या अहवालाची शहानिशा करावी. जिल्ह्यात 0 ते 6 वयोगटातील बालकांमधील खुजे व बुटके पणाचे प्रमाण कमी करणे महत्वाचे आहे. याबाबत काम करावे. असेही त्यांची सूचीत केले. बैठकीला संबधीत विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.