विशालराजे बोरे
व-हाड दूत विशेष
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा !!
आयुष्यभर विज्ञानवादी विचार प्रत्येक मनात तेवत ठेवणारे,भुकेलेल्यांना अन्न,तहानलेल्यांना पाणी,उघड्या नागड्यांना वस्त्र दशसूत्री प्रत्यक्ष अमलात आणून जगावेगळा विचार मांडणारे खरे लोकसंत म्हणजे श्री संत गाडगे महाराज..
देशाला स्वच्छतेचा मूलमंत्र देणाऱ्या संत गाडगेबाबांची मूर्तिजापूर ही खरी कर्मभूमी ठरली.संत गाडगे महाराजांनी १९०५ मध्ये मूर्तिजापूर येथे गोरक्षणची स्थापना केली. त्या परिसरात संत गाडगेबाबांनी कुटुंबीयांसाठी झोपडी उभारून तेथे वास्तव्यही केले आहे. त्यांच्या सेवाभावी कार्याचा वसा अनेकांनी जोपासत तो काळाच्या सोबत पुढे आणला.संत गाडगेबाबांचे पणतू सतीश सोनवणे यांच्या मार्गदर्शनात मूर्तिजापूरमध्येच मातोश्री कुंतामाता कन्या छात्रालय सुरू आहे.यामध्ये सध्या गोरगरिबांच्या ६० मुलींचे शिक्षण सुरू आहे.तर मुंबईतील श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा मिशनचे व्यवस्थापन मूर्तिजापूरचे प्रशांत देशमुख यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.संत गाडगेबाबांनी मुर्तीजापुरला सुरू केलेले गोरक्षणाचे कार्य बापूसाहेब देशमुख अविरतपणे करीत असून त्यांच्या व्यवस्थापनात अमरावती जिल्ह्यातील नागरवाडी येथे ८०० पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
१९५४ मध्ये संत गाडगेबाबांनी मुंबईत जे.जे. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रोगी व नातेवाइकांसाठी भायखळा येथे धर्मशाळा बांधली हीच प्रेरणा घेऊन २३ डिसेंबर १९८४ मध्ये दादर येथे संत गाडगे महाराज मिशन धर्मशाळेचा जन्म झाला. जी धर्मशाळा मागील ३५ वर्षापासून आजतागायत अखंड सेवेचे व्रत घेऊन कार्यरत असून आशिया खंडातील सर्वात मोठ्या टाटा मेमोरियल सेंटरला कर्करोगाच्या उपचारासाठी जगभरातून येणाऱ्या लाखो रुग्णांसाठी ‘हक्काचे माहेरघर” बनली आहे.
दादरची धर्मशाळा ही अखंड रुग्णसेवेचे व्रत घेऊन “सेवा परमो धर्म”कार्य करीत असून सात मजली धर्मशाळेमध्ये एकाचवेळी सातशे लोक राहण्याची व्यवस्था आहे.एक मोठा हॉल,२ लहान हॉल बांधण्यात आलेले आहेत ज्याचे मुंबईसारख्या ठिकाणी भाडे केवळ ५० रुपये प्रतिदिवस तर धर्मशाळेत एकूण १५० खोल्या रुग्णासाठी असून यामध्ये ४५० लोक राहू शकतात ज्यांचे प्रतिव्यक्ती भाडे केवळ ७० रुपये आहे.अनेकदा रुग्णाकडे भाडे देण्याचेही पैसे नसतात म्हणून आजवर लाखो रुग्णांना मायेचा आधार देणार्या संत गाडगेबाबा धर्मशाळेतुन कुठलाही रुग्ण कधीही परत गेल्याचा इतिहास नाही.
३६५ दिवस चालणारे संत गाडगेबाबा अन्नछत्र
२०२३ पर्यंत अन्नदात्यांच्या तारखा बुक
कर्करोगाच्या उपचारासाठी नेपाळ,बांगलादेश दार्जीलिंग,पश्चिम बंगाल,उडीसा,उत्तर प्रदेश मध्यप्रदेश यासह भारतभरातून आलेल्या रुग्णांसाठी संत गाडगेबाबा धर्मशाळा ‘मायेची साउली’ म्हणून कार्य करीत असून धर्मशाळेत येणारे रुग्ण गरीब कुटूंबातील असतात प्रसंगी त्यांच्याकडे मुंबईपर्यंत येण्यासाठीही पैसे नसतात त्यामुळे राहायचे कुठे? जेवायचे कुठे? हा प्रश्न पडणाऱ्या प्रत्येकाला गाडगेबाबा धर्मशाळा हे आपल्या हक्काचे घर वाटते. विशेष म्हणजे धर्मशाळेत येणाऱ्या प्रत्येकासाठी वर्षभर गाडगेबाबा अन्नछत्र चालवल्या जाते. ज्यामध्ये सकाळी ४५० लोकांना वरण-भात-भाजी-पोळी तर सायंकाळी ५५० लोकांना वरण-भात-भाजी-पोळी मिष्टान्नचे जेवण दिल्या जाते.जे कार्य वर्षातील ३६५ दिवस अखंडपणे सुरू असून “संत गाडगेबाबांच्या संदेशानुसार भुकेलेल्याना अन्न” हा विचार इथे रुजत असून विशेष म्हणजे गाडगेबाबा अन्नछत्रासाठी देशभरातील अन्नदाते पुढे आले असून धर्मशाळेतील अन्नछत्राच्या २०२३ वर्षापर्यंतच्या प्रत्येक दिवसाच्या तारखा बुक झालेल्या असून एखाद्या अन्नदात्याला अन्नदान करायची इच्छा असेल तर त्याला अन्नदानासाठी २०२३ ची वाट पहावी लागेल हे बहुदा जगातील एकमेव उदाहरण असेल.