वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
मुंबई: ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. या दुसऱ्या प्रकारच्या कोरोना विषाणूचा प्रसार अतिशय वेगाने होत असल्याचे त्यांच्या निष्कर्षावरून स्पष्ट होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सावध राहतानाच चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, मास्कचा वापर बंधनकारक करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. पुढचा धोका लक्षात घेऊन जागरुक राहण्याचे आवाहनही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी केले.
मुख्यमंत्री श्री.ठाकरे यावेळी म्हणाले, कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यात आतापर्यंत सर्वच यंत्रणांनी खूप मेहनत घेतली आहे. आता दुसऱ्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर गाफील राहून चालणार नाही. अधिक मेहनत घ्यावी लागेल. ऑक्सीजन, व्हेंटिलेटर्स, औषधे यांचा पुरेसा साठा करून ठेवावा, अलगीकरण-विलगीकरणाच्या सुविधा सज्ज ठेवाव्यात. हा विषाणू ज्या वेगाने पसरतो त्या प्रमाणात उपचारांची आणि चाचण्यांची क्षमता ठेवावी, असे त्यांनी सांगितले.