व-हाड दूत विशेष
संत गाडगेबाबांची आज (२० डिसेंबर) पुण्यतिथी. त्यानिमित्त त्यांच्या जीवनचरित्रावर विशेष लेख.
लेखक: अरविंद शिंगाडे, खामगाव मो.क्र. +91 94234 45668
————————————————————-
डेबुजी झिंगराजी जानोरकर या नावाच्या एका साध्या माणसाने विसाव्या शतकातील पाच दशकांपेक्षा जास्त काळ संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले होते . वर्हाडातील ग्रामीण भागातील जन्मभूमी, अंधश्रद्धा- कर्मकांड यांचा दुर्दैवी वारसा घेऊन या माणसाने आपल्या आयुष्यातील पन्नास वर्षे रंजल्या-गांजल्यांच्या उत्थानासाठी समाजाला अर्पण केले .डेबुजी ते संत गाडगेबाबा हा त्यांचा प्रवास काही साध्या आणि माणुसकीच्या तत्वांना सोबत घेऊन पूर्ण झाला .
देवळात जाऊ नका, मूर्तीपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी पुराणे, मंत्र-तंत्र, देव अन चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका, हेच लोकांच्या डोक्यात उतरवण्यात त्यांनी आपलं आयुष्य समाजाला अर्पण केलं.देवळातील दगडाच्या देवाला सर्वस्व मानणारा समाज विरुद्ध माणसात देव पाहणारा एक माणूस अशा परिस्थितीत गाडगेबाबांनी इथल्या समाजव्यवस्थेशी द्वंद्व केले .
मी कोणाचा गुरू नाही ,माझा कुणी शिष्य नाही. जातिधर्मांच्या भिंतीपलीकडे माणसाला माणूस म्हणून पाहणारा रोकडा धर्म बाबांना अपेक्षित होता. त्यासाठीच त्यांनी पायाला भिंगरी लागल्यागत अख्खा महाराष्ट्र पालथा घालून आपल्या खरपूस अशा वऱ्हाडी बोलीतून तथाकथित पंडितांनाही अंतर्मुख करण्यासाठी भाग पाडले . गाडगेबाबांना चालतेबोलते विद्यापीठ संबोधलं जायचं ते यासाठीच की, त्यांच्या हातातून सतत रचनात्मक कामे होत असत. कीर्तनाच्या माध्यमातून दररोज हजारो लोकांच्या समोर त्यांच्यातील तत्वज्ञ लोकांना हसवत हसवत अस्वस्थ करून सोडत असे. लौकिकार्थाने शाळेच्या चार भिंतींमध्ये न रमलेले गाडगेबाबा मात्र समाजाच्या शाळेतील लोकशिक्षक झालेले होते .
पुस्तकांमधून तथागत भगवान गौतम बुद्ध,छत्रपती शिवाजी महाराज ,संत तुकाराम, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या विद्वानांना वाचून पंडित झालेल्या लोकांना बाबांनी आपल्या कर्तृत्वातून अनेकदा अधिक विचार करावयास भाग पाडलेलं पाहायला मिळत होतं . समाजातील गोरगरीब ,दीनदुबळे यांच्यामधील अज्ञान ,अंधश्रद्धा आणि अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्याची त्यांची तळमळ म्हणजे सामाजिक न्यायाच्या दिशेने सुरू झालेला प्रवास होता.
बाबांचे एकंदरीत व्यक्तिमत्व लक्षवेधी असेच होते . आपला वेश आणि राहणीमान बाबांनी जाणीवपूर्वक वैशिष्ट्यपूर्ण करून ठेवलेला होता . मग अंगावर चिंध्या,डोक्यावर झिंज्या, खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू आणि दुसऱ्या हातात मडके असे एकंदरीत बाबांचं व्यक्तिमत्व होतं .थोडक्यात काय तर बाबांचा रूपाने महाराष्ट्रातील चालतं फिरतं गावच प्रत्ययास यायचं . यामधील प्रत्येक घटक हा ग्रामीण लोकजीवनाचे दर्शन घडविणारा होता . ग्रामीण लोकजीवन हेच इथल्या समाजव्यवस्थेचे भूषण आहे .बारा बलुतेदारीने इथला गावगाडा समृद्ध झालेला आहे. त्याला शिक्षणाचे महत्व कळले की, इथला बहुजन समाज हा स्वतःच्या विकासासोबत देश समृद्ध केल्या शिवाय राहणार नाही. म्हणून बाबांच्या कीर्तनात पाप-पुण्य, वैराग्य, संन्यास ,अंधश्रद्धा, कर्मकांड ,पूजा-अर्चा यांच्या भाकडकथा कधीच समाविष्ट झाल्या नाहीत . त्यांच्या कीर्तनात होते, स्वच्छतेचे धडे, शिक्षणाचे महत्त्व, आरोग्याविषयी जागृकता, समाजातील अंधश्रद्धांवर प्रहार आणि रंजल्या गांजल्यांच्या -दीनदुबळ्यांच्या – वयोवृद्धांच्या जबाबदारीचे भान .
थोडक्यात काय तर बाबांचे किर्तन म्हणजे अस्सल जीवन व्यवहार .बाबांनी कदाचित पुस्तके वाचली नसतील परंतु अशी पुस्तके लिहिलेली मोठी माणसे मात्र बाबांनी अचूक वाचून त्यांची पारख केलेली होती . म्हणूनच अशा पंडितांच्या पुस्तकातील सार बाबा आपल्या कीर्तनातून लोकांच्या समोर ठेवत असत .
भुकेल्यांना अन्न, तहानलेल्याला पाणी, उघडानागड्यांना वस्त्र, गरीब मुला-मुलींना शिक्षणाची संधी, बेघरांना आसरा, अंध-अपंग-रुग्णांना औषधोपचार, बेरोजगारांना रोजगाराची संधी, पशुपक्षी-मुक्या प्राण्यांना अभय, गरीब तरुण-तरुणींची लग्न आणि गोरगरिबांना शिक्षण असे लोकधर्माचे सार बाबांच्या कीर्तनातून सामाजिक न्यायाची मांडणी करत असे.
आयुष्यात कधीही देवळात न गेलेले बाबा त्याच देवळाच्या बाहेर माणसांच्या काळजीने गलबलून जात असत ,म्हणून त्यांनी लोकसहभाग आणि श्रमदानातून विविध धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये ,अनेक नद्यांकाठी घाट ,गरीब-अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था, कृष्ठरोग्यांच्या सेवेसाठी सेवाकेंद्रे स्थापन केली .
त्यांनी कधीही पैशाला स्पर्श केला नाही आणि एका ठिकाणी कधीच ते कामाशिवाय थांबले नाहीत .सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून सुरु केलेले काम पुढे नेण्याची जबाबदारी विश्वस्तांची असते .त्या विश्वस्तांनी आपण समाजाचे सेवेकरी या नात्याने आपली भूमिका पार पाडावी . याचा वस्तुपाठ बाबांनी आपल्या आयुष्यात घालून दिला होता अशा अनेक समाजोपयोगी कामांची परंपरा निर्माण केली .
बाबांच्या नावाने आज संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आहे .बाबांचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राहिलेले आहे . आज सगळीकडे समाजातील विविध घटकांच्या हक्क आणि न्याय यांविषयी चर्चा होत आहे .संत गाडगेबाबांच्या एकंदरीत जीवनकार्यातून उभा झालेला सामाजिक न्यायाचा वस्तुपाठ व्यवस्थेने स्वीकारला तर आज निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे त्यामधून मिळतील एवढे नक्की . आज लोकशिक्षक संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी , त्यांच्या जीवनकार्याचा अनुनय करण्यासाठी आपण सर्व तयार राहणे, हेच त्यांच्या कर्तृत्वाला विनम्र अभिवादन ठरेल.