वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
प्रशांत खंडारे
बुलडाणा: गेल्या ६० वर्षापासून सोयी सुविधांचा दुष्काळ,गावावर रौद्ररूप धारण करुन उभा असलेला डोंगर आणि वन्यप्राण्यांमूळे ओढावलेली मृत्यूची टांगती तलवार अशी ज्ञानगंगा अभयारण्यातील वनग्राम देव्हारीची भयकथा आहे. या गावाचा मे २०१९ रोजी पूर्नवसनासाठी सर्वे होवून सेक्शन ११ लागू झाला, गेल्या सप्टेंबर महिन्यात त्याची मुदत संपली.१ वर्ष लोटूनही २९८ कुटुंबांना कुठलाच शासकीय लाभ मिळालेला नाही. त्यामूळे पोटपाण्यात गुंतलेल्या ग्रामस्थांना “रमाईचे” घरकूल तर नाहीच शिवाय घरपणही लाभले नसून त्यांच्या मानसिक पूनर्वसनाचाही यक्षप्रश्न उभा ठाकला आहे.
बुलडाणा जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या १५ ते २० कि मी अंतरावर ज्ञानगंगा अभयारण्यात वनग्राम देव्हारी वसलेले आहे.ज्ञानगंगा अभयारण्यात टी-वन सी-वन पट्टेदार वाघाचा अधिवास आहे. दरम्यान टायगर कॉरिडॉर योजना राबविण्याचे प्रयत्न होत असले तरी देव्हारी गावचे पूर्नवसन होणे महत्वाचे आहे. या गावाने पूर्नवसनसंदर्भातील पर्याय ग्रामसभा घेऊन निवडला. मे २०१९ मध्ये पूर्नवसनाबाबत सव्हे करण्यात आला आहे.सेक्शन ११ लागू झाले.मात्र पूढील पूर्नवसन प्रक्रीयेचे घोडे कुठे अडले? कळायला मार्ग नाही.
वन्यप्राण्यांमुळे मृत्यूच्या दाढेतील देव्हारी हलाखीचे, गैरसोयीचे निसर्ग जीवन कंठत आहे. येथील विकास कोसो दूर असून येथे डिजिटलायझेशन केव्हा होईल?हा प्रश्न उपस्थित न केलेलाच बरे आहे. प्रत्यक्षात या गावाच्या पूर्नवसनासाठी तात्काळ निधी प्राप्त करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेवर व राजकीय इच्छाशक्तीवर निर्भर आहे. भविष्यात येथे वाघांची संख्या वाढली तर मानव- वन्यजीव संघर्ष होणार नाही, या दृष्टीनेही प्रशासकिय नियोजन होण्याची गरज आहे. मात्र समस्यांचा सुकाळ असलेल्या देव्हारीत चालायला धड रस्ते नाहीत. गर्भवतींना बुलडाण्याच्या रुग्णालयात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.आरोग्य सुविधा नाहीत. रोजगार हरविला आहे. शैक्षणिक सुविधांची वानवा आहे.जिल्हा परिषदेने ३ लाखाचा निधी शाळेसाठी मंजूर केला. मात्र सेक्शन ११ मूळे तो धूळ खात पडून असल्याचे सुरज हिवाळे यांनी देशोन्नतीला सांगितले. ग्रामस्थांना कुठलाही शासकीय योजनांचा लाभ नाही.शेतकरी लाभापासून वंचीत आहेत. खासदार, आमदार किंवा राजकीय व्यक्ती येथील समस्यांच्या निराकरणासाठी पुढाकार घेत नसल्याने देव्हारीच्या पूर्नवसनाचे देऊळ सध्या तरी पाण्यातच दिसून येत आहे.
२९८ कुटुंबाचे पूर्नवसन ऐरणीवर..
वनग्राम देव्हारी गावच्या पूर्नवसनाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. येथे जवळपास २९८ कुटुंबे असून त्यांच्या पूनर्वसनासाठी ५७ कोटी रुपयांची अवश्यकता असल्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र हा निधी कमी असल्याने ग्रामस्थांनी रितसर हरकत घेतली. मात्र परिणाम शुन्य आहे. गेल्या ७ ते ८ महिने कोरोना संसर्गामूळे याकडे दुर्लक्ष झाले असले तरी, शासनाने हा निधी आता तात्काळ उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
निवेदनातून टाहो…
पूनर्वसनाचा सर्वे होऊन १ वर्ष उलटले, मात्र अद्यापही प्रशासकीय हालचाली नाही. . रमाई घरकूल योजनेचे गावात २० जण पात्र आहेत. सेक्शन ११ लागू असल्यामूळे कुणाला शासकीय लाभ मिळत नाही. त्यामूळे पूनर्वसन करा नाही तर विकास कामांची परवानगी द्या, असा टाहो ग्रामस्थांनी निवेदनातून फोडला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या या निवेदनावर सरपंच आम्रपाली हिवाळे, साधना हिवाळे, वंदना झीने, शशीकांत हिवाळे, प्रशांत गवई, सुरज हिवाळे आदीसह ३२ जणांची स्वाक्षरी आहे.