वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला :दरवर्षी जुन महिन्यात शाळेची घंटा वाजते.विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यासाठी शासनामार्फत निधि पुरवण्यात येतो. यंदा शाळा बंद असल्या तरी सर्व शिक्षा अभियाना तर्फे शहरातील मनपा शाळेतील विध्यर्थ्यांसाठी गणवेशचा निधि खात्यात जमा करण्यात आला आहे. शाळा सुरू नाही तर गणवेशचा काय उपयोग? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
कोरोंनामुळे विद्यार्थी शाळेकडे फिरकलेच नाहीत.शाळा बंद असल्याने शासनाने विद्यार्थ्यांच्या गणवेशलाही कात्री लावली आहे. दरवर्षी देण्यात येणार दोन गणवेश रद्द करून यंदा एकच गणवेश देण्यात येणार असल्याची माहिती सर्व शिक्षा अभियान कार्यालयातून मिळाली आहे.अकोला महानगर पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दरवर्षी दोन गणवेश घेण्यासाठी प्रत्येकी 600 रुपये देण्यात येतात. यंदा मात्र 300 रुपये देण्यात येत आहेत.या विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी 13 लाख 98 हजार 600 रुपयांचे नियोजन करण्यात आले आहे. ही रक्कम संबधित शाळेची व्यवस्थापन समिति व मुख्याध्यापक यांच्या संयुक्त खात्यात जमा करण्यात आली आहे.निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये पहिली ते आठवी पर्यंतच्या 3448 विद्यार्थिनी, अनू. जाती मुले 632, अनू. जमाती 32 मुले, दरिद्रया रेषेखालील 550 मुले अश्या एकूण 4662 विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक गणवेश मिळणार आहे .