व-हाड दूत न्युज नेटवर्क
बुलडाणा : दिल्ली येथे सुरु असलेल्या आंदोलनातील शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याऐवजी केंद्रातील भाजप सरकार केवळ वेळ मारून नेत आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड संतापले असून ८ डिसेंबर रोजी देशव्यापी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसच्या महिला प्रदेश सरचिटणीस जयश्रीताई शेळके यांनी केले आहे.
दहा दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. ४० शेतकरी प्रतिनिधी व केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर, वाणिज्यमंत्री पीयूष गोयल, वित्त राज्यमंत्री सोमप्रकाश यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. परंतु ही पाचवी बैठकही निष्फळ ठरली. कोणताच तोडगा निघाला नाही. केंद्र सरकारने संमत केलेले तीनही कायदे शेतकरीविरोधी असल्याचे सांगत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने याआधी वेळोवेळी आंदोलने केली आहेत. सरकार आपल्या मागण्याबाबत उदासीन असून केवळ वेळ मारुन नेत असल्याने आंदोलक शेतकऱ्यांचा रोष वाढला आहे. चर्चा खुप झाली. आता शेतकरीविरोधी तीनही कायदे मागे घेतल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नसल्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. शेतकरी प्रतिनिधींनी कायद्यात सुधारणा करण्याचा मंत्रीगटाचा प्रस्ताव अमान्य केला आहे. कायदे मागे घेण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. शासनाने ९ डिसेंबरला पुन्हा बैठक बोलावली आहे. तर ८ डिसेंबरला आंदोलक शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ भारत बंदचे आयोजन केले आहे. या बंदमधे सहभागी होऊन अन्नदाता शेतकऱ्यांच्या आत्मसन्माच्या लढाईत जिल्ह्यातील प्रत्येकजण सहभागी असल्याचे दाखवून द्यावे, असे आवाहन जयश्रीताई शेळके यांनी केले आहे.