वऱ्हाड न्यूज नेटवर्क
अहमदनगर: नगरमधील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी हा दैनिक सकाळच्या नगर आवृत्तीचा कार्यकारी संपादक बाळ बोठे असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. नगर-पुणे मार्गावरील जातेगाव घाट परिसरात 30 नोव्हेंबर रोजी धारदार शस्त्राने जरे यांची हत्या झाली. गाडीला कट मारली म्हणून या लहान कारणामुळे त्यांची हत्या झाली अशी फूसट माहिती आधी समोर आली मात्र पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा करीत यामध्ये आरोपी फिरोज शेख, ज्ञानेश्वर शिंदे, आदित्य चोळके, सागर भिंगारदिवे, ऋषिकेश पवार सर्व राहणार नगर जिल्हा या पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केली. दरम्यान या खुनाचा मास्टरमाइंड अहमदनगर जिल्ह्यातील दैनिक सकाळ आवृत्तीचा कार्यकारी संपादक बाळ बोठे असल्याचे निष्पन्न झाले, सध्या तरी बोठे हा फरार आहे. आरोपी फिरोज व ज्ञानेश्वर यांनी दुचाकी जातेगाव घाट जवळ रस्त्यावर आडवी लावून जरे यांची गाडी थांबवली व त्यांचा गळा चिरून हत्या केली. आरोपींना बोठे यांनी 6 लाख रुपयांची सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले आहे. रेखा जरे यांच्या हत्येनंतर त्यांचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणला असता बोठे हा पूर्णवेळ रुग्णालयात हजर होता व मृतकांच्या कुटुंबियांना सांत्वन करीत होता, त्याबरोबर तो पोलिसांच्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवून होता, त्यादिवशी पोलिसांना बोठेवर शंका झाली. राज्यातील एका नामांकित दैनिकाचा संपादक ह्या सर्व घटनेचा मास्टरमाइंड निघाल्याने पोलिसही चक्रावून गेले. हत्येचं नेमकं कारण हे बोठे यांनाच ठाऊक असल्याने त्याचा शोध पोलीस घेत आहे, बोठे यांना अटक केल्यावर संपूर्ण घटनाक्रम कळेल अशी माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.
बाळासाहेब बोठे नामांकित पत्रकार
बाळासाहेब बोठे अहमदनगर जिल्ह्यातील पत्रकारितेच्या क्षेत्रातील नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे. त्याने राज्यातील नावाजलेल्या वर्तमानपत्रांमध्ये बातमीदार, मुख्य बातमीदार, राजकीय संपादक आणि निवासी संपादक अशा विविध पदांवर काम केलं आहे. याशिवाय काही फिचर वेबसाईटसाठीही त्याने लिखाण केलं आहे.
बाळासाहेब बोठे याची आतापर्यंत तब्बल 14 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. बाळासाहेब बोठे याच्या या पुस्तकांपैकी 6 पुस्तकांचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कला शाखेच्या पदवी अभ्यासक्रमात संदर्भग्रंथ म्हणून समावेश करण्यात आला आहे. मुद्दे आणि गुद्दे, पक्ष आणि निष्पक्ष, कानोकानी-पानोपानी आणि नेतृत्व मीमांसा ही 4 पुस्तकं पुणे विद्यापीठाच्या कला शाखेच्या राज्यशास्त्र विषयासाठी संदर्भग्रंथ म्हणून निवडण्यात आली आहेत.