वऱ्हाड दूत विशेष
रात्रीचे दोन वाजलेले असतात… थंडीनं वातावरण पार गारठून गेलेलं असतं. त्याचवेळी सारं शहर गाढ झोपलेलं असतं… मात्र, वाढलेली थंडी ‘त्या’ला अस्वस्थ करतेय… मिनिटागणीक त्याची बेचैनी वाढत असतेय…. त्याच्या मनात एकच विचार घोळत असतो… स्टेशनसमोरच्या पार्कींगमधली ‘ती’ माणसं कशी झोपली असतील…. ती थंडीनं कुडकुडत तर नसतील ना?… मनात उठलेलं प्रश्नांचं काहूर अन मनाची अस्वस्थता यातून मन थेट त्याला गाडी काढायला सांगतेय. अन ‘तो’ एव्हढ्या रात्री गाडीला किक मारतो अन येतो थेट स्टेशनवर… ‘त्या’च्या आवाजानंच ‘ती’ माणसं जागी होतात. एव्हढ्या रात्री आपल्या या ‘मित्रा’ला पाहून त्यांच्या अबोल चेहर्यावर निरागस हास्य उमटतं… तो हळूच सोबत आणलेला ब्लँकेटचा गठ्ठा खोलतो.. अन ‘त्या’ सार्यांना वाटून देतो….
‘तो’ हूडहूडी भरवणार्या थंडीत कुडकुडत परत गाडीला किक मारत घराकडे निघतो. मात्र, ‘त्यानं’ दिलेल्या ब्लँकेटमधील मायेच्या उबेनं ‘त्या’ अबोल, अनाम, निरागस चेहर्यांवर हास्य फुललेलं असतंय. गेली २१ वर्ष झालीत….ऋतू कोणताही असो.. तो कायम असाच अस्वस्थ असतो… मात्र, त्याच्या अस्वस्थतेनं समाजातील एका उपेक्षित, दुर्लक्षित वर्गाला त्यांचा ‘पालक’ मिळालाय. जग, समाज ज्यांना ‘पागल’, ‘वेडे’ म्हणून हेटाळणी करतो तिच या माणसाचे सगे-सोयरे झाले आहेत…
अकोल्यात वेड्यांसाठी झटणार्या या ध्येय्यवेड्याचं नाव आहेय पुरूषोत्तम शिंदे…. २० वर्षांपासूनचा या माणसाचा हा अनोखा सेवायज्ञ सुरू आहेय… मात्र, हा माणूस प्रसिद्धीपासून कोसो दूर आहेय. पत्रकारितेतील अनेकांचा जवळचा मित्रं असुनही या माणसानं प्रसिद्धीपासून चार हात लांब राहणंच पसंद केलंय. कारण, त्याला ‘समाजसेवक’ म्हणून मिरवण्यात कधीच ‘हौस’ वाटली नाहीय. ना त्याला कधी कोणत्या पुरस्काराचा ‘सोस’ झाला… अलिकडच्या स्वार्थाच्या वाळवंटात पुरूषोत्तमभाऊ म्हणूनच माणुसकीचा ‘ओयासीस’ अन ‘हिरवळ’ वाटतो. सुरेश भटांच्या या ओळींत मला तुम्ही भेटलात. सुरेश भट म्हणतात की,
‘जन्मभर अश्रूंस माझ्या शिकविले नाना बहाणे;
सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही!
कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो;
पण प्रकाशाला तरीही हाय, मी पटलोच नाही!
सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळले मी;
एकदा हसलो जरासा, मग पुन्हा हसलोच नाही!’….
दिवसभरात हा माणुस तूम्हाला दररोज हमखास कुठे ना कुठे भेटणारच… कधी अशोक वाटीका चौक, कधी गोरक्षण रोड, कधी स्टेशन, कधी बस स्टँड तर कधी थेट जुन्या शहरात… कारण, एकच प्रत्येक ठिकाणची ही ‘वेडी’ माणसं ठिक तर आहेत ना. पुरूषोत्तमभाऊंना शहरातील जवळपास सर्वंच वेड्यांची ठिकाणं माहित आहेत. बरं, हा माणुस फक्त त्यांना भेटतच नाही तर त्यांची नखं कापून देतो. कधी त्यांची अंघोळ घालतो. त्यांना सोबत घेऊन एखाद्या टपरीवर चहा पितो… त्यांची कटींग-दाढी करायला घेऊन जातो. मी अनेकदा त्यांच्या गाडीवर वेडी माणसं पाहिलीत… गाडीवर बसवत त्यांना कधी दुकानातून चप्पल घेऊन दे किंवा दवाखान्यात नेऊ दे… या लोकांना पाहून नाकाला रूमाल लावलेली माणसं तर मी अनेकदा पाहिलेली… परंतू, हा माणुस या वेड्यांना गाडीवर बसवत ऐटीत त्यांना गाडीची रपेट करवून आणतो…
बरं, या माणसाच्या गाडीची डिक्की मी कधीच रिकामी पाहिली नाहीय. त्यात नेहमीच कपडे, चपलांचे जोड, उपरणे, टाँवेल, नेल कटर असं साहित्य असतंच असतं… कारण, कोणताही वेडा दिसला तर यातलं आवश्यक साहित्य त्याला दिलं जातंय. बरं, माणुसपण जपत औषधविक्रीचा छोटासा व्यवसाय असणारा हा माणुस फारच श्रीमंत आहेय असंही नाही. मात्र, मनाच्या, संवेदनेच्या श्रीमंतीमूळं हा माणुस हे जगावेगळं काम अगदी अव्याहतपणे करतो आहेय.
वेड्यांचं स्वत:चं विश्व अन भावविश्व असतं… ते आपल्या विश्वाच्या पार पलिकडचं असतं… त्यांच्या आभासी अन निरागस विश्वात नाती, स्पर्धा, पैसा, भावना, समज हे काहीच नसतं… मात्र, अकोल्यातील वेड्यांच्या विश्वात माणसांच्या जगातलं एकच नाव ओळखीचं… ते नाव म्हणजे पुरूषोत्तम भाऊंचं… बरेचदा अबोल असणारे किंवा स्वत:शी आभासी वायफळ बडबड करणार्या या वेड्यांना पुरूषोत्तम भाऊ अगदी सहज बोलतं करतात. ते अनेक वेड्यांवर उपचारासाठी आपल्या परीनं प्रयत्न करतात. त्यांना कुटूंबियांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांची मोठी धडपड असतेय…
पुरूषोत्तमभाऊ!, अलिकडे माणुसकीची क्षितीजं आखुड होतांना पाहिलीय. त्यात तुमच्यासारखी माणसं हे माणुसकीचं अख्ख आकाश कवेत घेत कशी जगतात?, याचा प्रश्न अनेकदा पडतो. मी तूम्हाला शांत कधी पाहिलंच नाही. कधी गरिबांची दिवाळी चांगली व्हावी म्हणून समाजाला ‘रद्दी’ मागणारा माणूस म्हणून…. तर अनेकदा एखादा वेडा आजारी पडला म्हणून अस्वस्थ झालेलं पाहिलंय. तूमच्या जीवननिष्ठा फार तगड्या आहेत. कारण, अलिकडे मी, माझं असं विचार करणारे माणुसकी अन माणसांचे ‘बोन्साय’च बघायला मिळतात… त्यात, तूमच्यासारखी फक्त समाजाला चांगुलपणाचं दान देणारी माणसं पाहिली की जगण्याची नवी ऊर्जा मिळते. भाऊ, तूम्ही खर्या अर्थानं नावाप्रमाणंच ‘पुरूषोत्तम’ आहात.
पुरूषोत्तमभाऊ!, तूमच्यासारखी माणसं या समाजाचे ‘एसेट’, ‘रियल हिरो’ अन खरे ‘आयकाँन’ आहेत… भाऊ, तूमचे वेड्यांबाबतचे अनुभव, त्यांचं जगावेगळं भावविश्व नक्की भविष्यात समाजासमोर येऊ द्यात… ‘वेड्यांच्या जगात’ नावानं… तूमच्या माणुसपणाच्या परिघात आल्यानं तूमच्या विचारांनी मी स्वत:ही सम्रूद्ध झालोय. वेड्यांना मुख्य प्रवाहात आणणार्या तूमच्या ध्येय’वेडे’पणाला साष्टांग दंडवत… तुमच्या भावी वाटचालीस आभाळभर शूभेच्छा…..
पुरूषोत्तम शिंदे यांचा संपर्क क्रमांक : +919823793820
उमेश अलोणे,
अकोला.