व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: मुळव्याध जीवघेणा आजार नसला तरी वेदनादायी निश्चितच आहे. या व्याधिला अवघड जागेचे दुखणे म्हणता येईल, आहार, निद्रा, व्यायाम या बाबत सातत्य राखल्यास या आजाराला नियंत्रित करणे शक्य असल्याचे मत होमिओपॅथी तज्ञ डॉ.संदीप चव्हाण यांनी जागतिक मुळव्याध दिनानिमित्त बोलताना सांगितले.
20 नोव्हेंबर जागतिक मुळव्याध दिन म्हणून पाळला जातो असे सांगून डॉ.चव्हाण म्हणाले, या व्याधिच्या सर्वसाधारण लक्षणांमध्ये शौचेच्या जागी आग होणे, बसताना त्रास, शौच करताना असह्य वेदना होतात, रक्तस्राव होतो. संडास कडक किंवा साफ न होणे, पाणी कमी पिणे, अवेळी झोप, भोजन, मसालेदार, तिखट पदार्थांचे नियमित सेवन ही मुळव्याधीची सर्वसाधारण कारणे आहेत. त्यावर उपाय म्हणजे पाणी अधिक प्रमाणात प्यावे, भोजन, निद्रेच्या वेळेत नियमितता असावी, व्यसनांपासून दूर राहावा, मसालेदार, तिखट पदार्थांचे सेवन टाळावे तसेच औषधोपचार पद्धतीत होमिओपॅथी पद्धतीचा अवलंब करावा, दैनंदिन व्यायाम करुन मुळव्याधमुक्त जीवन जगता येते. या पद्धतीमुळे रुग्णांना कायमस्वरुपी बरे वाटते असेही डॉ. चव्हाण म्हणाले.