व-हाड दूत न्युज नेटवर्क
सांगली: येथील प्रतिष्ठा फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा स्त्री प्रतिष्ठा साहित्यिक सन्मान पुरस्कार सौ. रश्मी उल्हास हेडे यांना जाहीर झाला आहे, असे या प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री तानाजीराजे जाधव यांनी कळवले आहे.
या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. सौ. रश्मी हेडे या मागील २६ वर्षापासून इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता पहिली ते सातवीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी घरीच शिकवणी वर्ग घेत आहेत. त्या दिवसभरात ३ बॅचेस घेत असतात. प्रत्येक बॅचमध्ये १५ विद्यार्थी असतात. दरवर्षी अशा ४५ विद्यार्थ्यांना त्या प्रामाणिकपणे शिकवत असतात. लेखन याचबरोबर गेली ८ वर्षे त्या विविध विषयांवर लेखन करीत आहेत.
विशेषतः कोरोनाच्या काळात सर्व कामकाज ठप्प झाल्याने त्या सतत जागृतीपर, प्रेरणादायी लिखाण विविध वृत्तपत्रे व वेबपोर्टलवर करीत आहेत. असे जवळपास ४० लेख त्यांनी लिहिले आहेत. या लिखाणाबद्दल आतापर्यंत त्यांना सत्यवादी ह्यूमन राईट्स,मुंबई, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अँड फिजिकल हेल्थ सायन्सेस, नवी दिल्ली, भारतीय महाक्रांती सेना, मुंबई या संस्थानी गौरविले आहे. याचबरोबर सर्व सामान्यांना प्रेरणा दायी ठरत असलेलं बंदिस्त पान हे आत्मकथन त्या क्रमशः प्रसिद्ध करीत आहेत. अजूनही त्यांचे लेखन सातत्याने सुरू आहे. सातारा येथे गेल्या १५ वर्षांपासून त्या विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमात कार्यरत आहेत. त्यांनी अनेक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देखील केले आहे, अशी माहिती सौ. आशा अशोक कुंदप यांनी दिली.