मंगेश फरपट |
वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: “दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असे म्हटले जाते, पण अनेक गरिब कुटुंबात कुठली आलीया दिवाळी? कुठून आणणार नवीन कपडे…कसे करणार फराळ..?हीच विवंचना आहे. घरात लहान मुलांना नवीन कपडे नाहीत की फराळाचे गोडधोड…? बुलडाण्यातील अशा गरीब कुटुंबाची चिंता आता मिटली आहे.
कारण, दिव्या फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक काकडे यांनी सुरू केलेल्या “आपुलकीची दिवाळी”नेतत्पूर्वी उबदार कपडे वाटले,आता गरीबांच्या घरातील सदस्यांसाठी फराळाचा प्रश्नही निकालात काढला आहे. त्यामुळे निराधारांची दिवाळी गोड झाल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
दिवाळी हा सण प्रत्येकाचा मग तो गरीब असो श्रीमंत की मध्यमवर्गीय. फरक एवढाच की ती साजरी करण्याची पद्धत प्रत्येकाची निराळी. साध्या भाषेत दिवाळी कोणासाठी कशी याचं वर्गीकरण करायचं म्हंटल तर अगदी सोपे आहे. दिवाळी ही आनंदाची की पैशाची हा प्रश्न मनात डोकावतो. दिवाळी म्हटलं की, आले नवीन कपडे भेटवस्तू, फटाके, फराळ, मिठाई. पण हे सगळं करण्यासाठी लागतो तो पैसा. दिवाळी म्हटलं की, लोक बिनधास्त खर्च करतात. पण सणासुदीला व्यापारी, दुकानदार वस्तूंचे भाव वाढवतात. गरीबांना हे भाव बघूनच ती घेण्याची आस संपते. मध्यमवर्गीय काहिशा प्रमाणात घेतात तरी पण श्रीमंतांची बातच न्यारी कारण बनवणारे ही तेच आणि विकणारे तेच असतात. कोणासाठी दिवाळीची खरेदी हजारात होते तर कोणाची लाखाच्या घरात जाते. एकंदरित काय तर दिवाळी साजरी करण्यामागचा उद्देश अस्ताला चालला आहे. पूर्वी साजरी होणारी दिवाळी ही आनंदाच्या दागिन्यांनी सजलेली असायची. पण आता मात्र त्याला अहंकाराची चमक लागली आहे. दीन दीन दिवाळी खरंच दिनांची दिवाळी राहिली नाही. मोठमोठ्या भेटवस्तू, अलंकार, महांगडे कपडे ही श्रीमतांची दिवाळी. घरीच केलेला फराळ नातेवाइकांना देणं-घेणं ही मध्यामवर्गीयांची दिवाळी. दोन वेळच अन्नाची सोय नसलेल्या गरीबाला काय परवडत असेल. पण काहीजण दिवाळीनिमित्त्त आश्रमांना, गरीबांना भेटवस्तू देतात. काहीजण स्वत:ची कला करुन कंदील पणत्या विकून दिवाळी साजरी करतात. मुलांच्या चेहऱ्यावरचा फराळ खातानाचा आनंद, नवीन कपडे घातल्यानंतर चेहऱ्यावरच तेज हीच त्या पालकांसाठी खरी दिवाळी असेल. म्हणूनच दिव्या फाऊंडेशन निराधार व गोर गरीबांसाठी सरसावली आहे. दिव्या फांऊडेशनने दिवाळीच्या पूर्वसंध्येवर फराळ वाटप करुन गरीबांप्रति गोडवा निर्माण केला आहे. शहरातील रस्त्याच्या एका साईडला पाल वस्ती,बेघर बांधव, मलकापूर रोड धाड नाका रोड खामगाव रोड मलकापूर बुलडाणा आदी ठिकाणी आपुलकीची दिवाळी साजरी करण्यात आली. याप्रसंगी राजेश हेलगे कृष्णा हॉटेल,कोकिळा तोमर,आशिष खडसे, अशोक ब्रह्मराक्षस,राजू देशमुख, योगेश सिंगरकर, विक्रमसिंग ठाकूर,यांची मदत लाभली,तर उपक्रमासाठी अशिष खडसे, जीवन मुपडे, सुभाष रणदिवे,योगेश सिंगरकर,चंद्रकुमार बहेकर,पवन पाथोडे, राकेश रोकडे संध्या फुंडे, सचिन फुंडे, गजानन अवसरमोल,चंचल भोपळे,ज्योती गवई,विलास भिसे,सुनील तिजारे,यांची उपस्थिती होती.
‘दिवाळीत घरोघरी उत्साहाचे वातावरण असते. प्रत्येक कुटुंब ऐपतीप्रमाणे दिवाळीचा आनंद साजरा करतात. पण गोरगरिबांना यापासून वंचित राहावे लागते. गोरगरिबांना किमान फराळ मिळावा म्हणून ‘आपुलकीची दिवाळी’ उपक्रम हाती घेतला आहे. हा उपक्रम राज्यभर सुरु असून निराधार, गरीब कुटुंबांना फराळ देण्यात येत आहे.
– अशोक काकडे
संस्थापक अध्यक्ष, दिव्या फाऊंडेशन बुलडाणा.