वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
खामगाव : पर्यावरण व जैवविविधता संरक्षणासाठी शासकीय तथा सामाजिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू असून त्याकरिता जनसामान्यांचे कल्याणासाठी व निसर्ग रक्षणा करीता दिन विशेष निमित्ताने अनेक उपक्रम राबवित असतात.
असाच अभिनंदनीय उपक्रम शासकीय तथा सामाजिक स्तरावर खामगाव येथील वनपरिक्षेत्र विभाग व लाॅयन्स क्लब संस्कृती, खामगावच्या वतीने दि.७ नोव्हेंबर रोजी वनपरिक्षेत्र विभागाचे कार्यालय परिसरात राबविण्यात आला.
दि.५ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत संपूर्ण राज्यात पक्षी सप्ताह राबविण्यात येत असून या ठिकाणी आगळ्या वेगळ्या पद्धतीने पक्षी सप्ताहाचे नियोजन करण्यात आले असून आज दि.७ नोव्हेंबर रोजी वनपरिक्षेत्र विभाग व लाॅयन्स क्लब संस्कृती खामगावचे वतीने ग्रामीण भागातील शिक्षकांकरीता कार्यशाळा व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन सोशल डिस्टंसिंगचे भान ठेवून करण्यात आले.
यावेळी पक्षीमित्र संजय गुरव यांचे पक्षी छायाचित्र व पक्षी विषयाची वर्तमानपत्राची कात्रण प्रदर्शनी अभ्यासासाठी उपलब्ध करून दिली असून कार्यशाळेला उपस्थित शिक्षकांना पर्यावरणपूरक कृत्रिम पक्षी घरटे देवून सन्मानित करण्यात आले.
ही घरटी शिक्षकांना आपल्या शाळेत लावण्याची सूचना यावेळी आपल्या मार्गदर्शनातून कलाध्यापक संजय गुरव यांनी केली कारण दिवाळी सुटीनंतर जेव्हा विद्यार्थी शाळेत प्रवेश करतील तेव्हा त्या घरट्यात त्यांना चिमणी पक्षी व पिल्ले बघावयास मिळतील व त्याच्यामध्ये पक्षी प्रेमाची भावना जागृत होईल. पुढच्या पिढीला पक्षी विविधता पहावयास मिळेल या दृष्टीने शिक्षकांनी आजपासूनच विद्यार्थ्यांना निसर्ग रक्षणाची धडे देणे गरजेचे आहे. असे आपल्या कार्यशाळेचे माध्यमातून संजय गुरव यांनी सांगितले.
संजय गुरव हे अरजन खिमजी नॅशनल हायस्कूल येथील कलाध्यापक तथा पक्षीमित्र श्री. संजय गुरव हे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षीसंवर्धनासाठी वर्षभर विविध उपक्रम राबवतात.
शहरातील काॅंक्रीट घरांच्या वसाहतींमुळे आज अनेक झाडे व पर्यावरणातील वन्यजीव -हास पावत आहेत. घरटी बांधायला झाडे हवीत, गवत हवं, पर्यावरणातील पूरक बाबी हव्यात ती कमी होत आहेत मग यावर उपाय काय ? यावर देवदार लाकडापासून तयार केलेली कृत्रिम घरटी ही चांगला पर्याय ठरत आहे. आजवर त्यांनी २८००० च्या वर कृत्रिम घरटे तयार करून वितरित केलेली आहेत.
चिमणी व इतर सर्वच पक्षी पर्यावरण संवर्धनात खूप मोठे काम करत असतात. वृक्षांची बिजे पक्षांमार्फत परिसरभर व परिसराबाहेर वाहून नेतात.
मुलांमधे लहानपणापासूनच पक्षीप्रेम वृध्दिंगत व्हावे व त्यांना पक्ष्यांची निगा कशी राखता येईल तसेच पक्षी निरिक्षणे याबाबत शिक्षकांमार्फत माहिती पोहोचावी यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी खामगाव व लॉयन्स संस्कृती क्लब खामगाव यांच्या संयक्त विद्यमाने तालुक्यातील ग्रामीण शाळांमधील शिक्षकांची कार्यशाळा व घरटे वाटप करण्यात आले.
कार्यशाळेचे मार्गदर्शन पक्षीमित्र संजय गुरव यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी लॉयन्स संस्कृती क्लब खामगावचे अध्यक्ष श्री. सुरज अग्रवाल तर अध्यक्ष म्हणून वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. पडोळ हे होते.
खामगाव शहर व शहरानजिक असलेल्या काही शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये बालवयात पक्षीप्रेम वृध्दिंगत व्हावे यासाठी पक्ष्यांसाठी तयार केलेले कृत्रिम घरटे मोफत वितरित करण्यात आले.
५ ते १२ नोव्हेंबर हा पक्षीसप्ताह म्हणून साजरा केला जातो. या सप्ताहात जगभरातील पक्षीप्रेमी विविध पक्ष्यांची निरिक्षणे व अभ्यास करतात, पक्षीप्रेम सर्वांमधे वृध्दिंगत व्हावे यासाठी विविध उपक्रम राबवतात.
यावेळी शिक्षक विनोद खवले, प्रदिप गवळी, गणेश राऊत, ग्रामसेवक सोळंके व महाविद्यालयीन विद्यार्थी सौरभ इंगळे यांनी आपली मनोगते यावेळी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन किशोर भागवत तर आभार प्रदर्शन सुरेश भोपळे यांनी केले.