मुलगी पाहण्यासाठी आलेल्या चेन्नईच्या कुटुंबाला अकोल्यात लुटले!

0
353

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: चेन्नई येथील कुटुंब अकोल्यात मुलगी पाहण्यासाठी आले असता येथील काही युवकांनी त्यांना मारहाण करून लुटल्याची घटना घडली. त्यांच्याकडून तब्बल 11 लाख 68 हजारांचा ऐवज लुटण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी काल रात्री उशीरा तिघांना अटक करून त्यांच्याकडून 10 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. अमरदीप पाटील, अमोल मोरे, अभिजित इंगोले अशी या आरोपींची नावे आहेत.
चेन्नई येथील दीपकराज भीमराज जैन हे मुलाच्या लग्नासाठी मुलीच्या शोधात असताना त्यांचा नातेवाईक असलेल्या कैलासने अकोल्यातील एक व्यक्ती मॅरेज ब्युरो चालवीत असल्याची माहिती त्यांना दिली तसेच त्याच्याशी मोबाईलच्या माध्यमातून संपर्क देखील साधून दिला होता. त्यानुसार दीपकराज जैन, मुलगा दिलीपकुमार जैन, आई, बहीण आणि भाचा हे मंगळवारी दुपारी अकोल्यात आले. त्यांनी येथील व्यक्तीशी संपर्क साधला. त्याने या सर्वांना ऑटोमध्ये बसवून विझोरा गावाच्या रस्त्यावर नेले. तेथे अगोदरच दोघेजण दुचाकीवर हजर होते. त्यांनी मारहाण करून त्यांच्या जवळील सर्व मुद्देमाल घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, या प्रकरणी दीपकराज यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्ह्याची व्याप्ती पाहता सहायक पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक जयंत सोनटक्के, अश्विन मिश्रा, किशोर सोनोने, वसीम शेख, शक्ती कांबळे, सायबर सेलचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत संदे, गणेश सोनोने यांनी तपास सुरू केला. या तपासात पोलिसांनी अमरदीप पाटील, अमोल मोरे, अभिजित इंगोले या तिघांना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली. या तिघांनी आणखी दोघे सोबत असल्याचे सांगून गुन्हा कबूल केला. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरलेल्या मुद्देमालापैकी 10 लाखांचा ऐवज जप्त केला आहे.

Previous articleकोरोना अलर्ट : प्राप्त 1235 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 129 पॉझिटिव्ह
Next articleसिं.राजा तालुक्यात अतिवृष्टीमुळे सर्वात जास्त नुकसान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here