अमरावती : कापूस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी तसेच रोजगार संधी विस्तारल्या जाव्यात या दृष्टीने संत गाडगेबाबा सहकारी सूतगिरणी मर्यादित, दर्यापूर जिल्हा अमरावती, सुरु व्हावी यासाठी सहकार विभाग, वस्त्रोद्योग विभाग आणि राज्य सहकारी बँक यांनी एकत्रितरित्या पावले उचलण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत.
अमरावती जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला उर्जितावस्था आणण्यासाठी, तसेच दर्यापूर येथील संत गाडगेबाबा सहकारी सूतगिरणी यासह इतरही संस्थांबाबत पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा होत आहे. त्याअनुषंगाने आज विधानसभा अध्यक्ष श्री.पटोले यांच्या दालनात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस पालकमंत्री यशोमती ठाकूर, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, वस्त्रोद्योग विभागाचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार बळवंतराव वानखेडे, वित्त विभागाचे प्रधान सचिव राजीव मित्तल, वस्त्रोद्योगाचे प्रधान सचिव पराग जैन आदीसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.विधानसभा अध्यक्ष श्री. पटोले म्हणाले, ही सूतगिरणी पूर्ण क्षमतेने सुरू होणे आवश्यक असून त्यामुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादकांना दिलासा मिळेल. त्याचप्रमाणे तरूणांना रोजगार संधीही प्राप्त होईल. त्यादृष्टीने संबंधित सर्व विभागांची भूमिका महत्त्वाची असून, त्यासंदर्भात एक महिन्याच्या आत तातडीने कार्यवाही व्हावी. संबंधित विभागांच्या मंत्री महोदयांनी यासंदर्भात सर्व संबंधितांची बैठक घेऊन पुढील कार्यवाही करावी अशा सूचनाही श्री.पटोले यांनी यावेळी दिल्या.
अंबादेवी साखर कारखाना पूर्ववत सुरू न केलेल्या कंपनीवर कारवाईचे आदेश
अंबादेवी साखर कारखाना पूर्ववत सुरू करण्याच्या अटींवर विकला गेला आहे. मात्र, अटींची पूर्तता न केल्याने ऊस उत्पादक शेतकरी आणि बेरोजगार यांच्या समस्या वाढल्या आहेत. संबंधित कारखाना खरेदी केलेल्या कायनेटीक पेट्रोलियम कंपनीवर नियमान्वये कारवाई करण्यात यावी. कारखाना सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत. संबंधित कारवाईचा अहवाल एक महिन्यात सादर करावा, असे आदेश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
रोजगाराच्या संधी वाढतील : पालकमंत्री श्रीमती ठाकूर
जिल्ह्यात सहकारी संस्थांचे जाळे मजबूत होणे आवश्यक आहे. सूतगिरणी सुरू झाल्यास कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना दिलासा मिळेल व रोजगाराच्या संधीही वाढतील. त्यादृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले.