बालकावरील अत्याचारप्रकरणी आरोपीस सात वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

0
252

बुलडाणा:येथील पाच वर्षीय बालक घरासमोर खेळत असताना चॉकलेट देतो या बहाण्याने त्याला घरात नेवून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी सिद्धार्थ सपकाळ, रा. बुलडाणा (वय 23 ) यास भादंविचे कलम 377, बाळाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4 अंतर्गत सात वर्ष सश्रम कारावास व तीन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सदर दंड न भरल्यास एक महिन्याची पुन्हा शिक्षा आरोपीस होणार आहे.   सदर निकालाची सुनावणी बुलडाणा येथील सहजिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. एस महाजन यांनी केली आहे.

    या प्रकरणात दि 3 मे 2019 रोजी सकाळी अंदाजे 8 वाजेसुमारास पिडीत बालक आरोपीच्या घरासमोर खेळत असताना आरोपीने चॉकलेट देतो असे म्हणून घरात बोलाविले. बाजूच्या खोलीत नेवून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. दरम्यान त्रासामुळे बालकाने आरडा ओरड केली असता आरोपीने त्याला सोडून दिले व तेथून पळून गेला. सकाळी 9.30 वाजता रडत रडत घरी जात बालकाने ही हकीकत आपल्या आईला सांगितली. बालकाच्या आईने दिलेल्या रिपोर्टवरून बुलडाणा पोलीस स्टेशनला आरोपीविरूद्ध भादविचे कलम 377 व बाळाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमन 2012 चे कलम 4 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पूर्ण केल्यानंतर दोषारोपपत्र बुलडाणा येथील विशेष न्यायालयात दाखल करण्यात आले. रिपोर्ट दाखल केल्यानंतर पिडीताला 48 तास डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवून त्याच्यावर उपचार करण्यात आले.

     सदर प्रकरणात सरकारी पक्षातर्फे फिर्यादी / पिडीतची आई, 5 वर्षीय पिडीत बालक, वैद्यकीय अधिकारी डॉ शालीकराम निकाळे, डॉ स्वाती गजानन गोलांडे व तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विनायक रामोड यांची साक्ष विशेष न्यायालयात नोंदविण्यात आली. सदर सर्व साक्षीदारांचे साक्ष पुरावे घटनेला पुरक व एकमेकांशी सुसंगत असल्या कारणाने पिडीताचेवर आरोपीने अत्याचार केल्याचे निष्कर्षाप्रत विशेष न्यायालय आले व सदर शिक्षा न्यायालयाने सुनावली. या प्रकरणात फिर्यादी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड सोनाली सावजी देशपांडे यांनी सरकारी पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडली. याप्रकरणात त्यांना बुलडाणा पोलीस कोर्ट पैरवी पोहेकॉ किशोर कांबळे, पोलीस स्टेशन बुलडाणा यांनी सहकार्य केले, असे विशेष सरकारी वकील तथा सरकारी अभियोक्ता यांनी कळविले आहे.

Previous articleबुलडाण्यात आज 99 कोरोना पॉझिटिव्ह; धोका कायमच!
Next articleनुकसानग्रस्त शेतीचे सरसकट पंचनामे करावे – पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here